माजी महापौर कळमकरांवर अत्याचाराचा गुन्हा:२५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा ठपका




शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कळमकर यांनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिला संपर्कात ठेवले होते. १८ फेब्रुवारी रोजी शिरूर (जि. पुणे) येथील मार्वेल हॉटेलमध्ये तसेच त्यापूर्वी विळद घाट परिसरात नेऊन आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडणे आणि अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. आपल्याला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली गेल्याने अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेने या छळासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर फरार असून, त्यांच्या अटकेसाठी तातडीने चक्रे फिरवली आहेत. नगर आणि पुणे जिल्ह्यांत विविध ठिकाणी धाडसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी हे करत आहेत. गंभीर आरोपांमुळे खळबळ जबाबदार पदावरील व्यक्तीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. व्हिडिओ कॉलवरून होणारा छळ आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *