अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून तिचा मारेकरी शोधला – VastavNEWSLive.com
सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया हिंगोली पोलीसांनी केली
हिंगोली(प्रतिनिधी)-औरंगाबादमध्ये खून करून पोलीस ठाणे औंढा नागनाथच्या हद्दीत महिलेचे प्रेत टाकून गायब झालेल्या व्यक्तीला हिंगोली पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.
दि.24 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे औंढा नागनाथ हद्दीतील नागेशवाडी शिवारात मसोबा मंदिराच्या पाठीमागे जंगलात 25-30 वर्ष वयोगटाच्या महिलेचे प्रेत सापडले. तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते, शरिरावर जखमा दिसत होत्या. म्हणून पोलीसांनी याबाबतची सुत्रे जोरदारपणे हलवली. महिलेची ओळख नाही. हा सर्वात मोठा आव्हानाचा प्रसंग पोलीसांसमोर होता. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नागेशवाडी शिवारात भेट देवून योग्य सुचना दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक विकास पाटील, औंढा नागनाथ येथील पोलीस निरिक्षक गणेश राहिरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या कामगिरीला शोधण्यासाठी कंबर कसली.
मयत महिलाच ओळखीची नाही तर तिला मारणारा कोठून मिळणार या आव्हानाला पोलीसांनी मोठ्या ताकतीने वेगवेगळ्या दृष्टीकोणातून विचार करून अगोदर महिलेची ओळख पटवली. तिचे नाव अलका बाजीराव बेेंद्रे(29) रा.सदाफुले वस्ती ता.जामखेड जि.अहिल्यानगर असे होते. या छोट्याशा धाग्याला हिंगोली पोलीसांनी अत्यंत उत्कृष्टपणे पुराव्याची एक-एक कड जोडून साखली तयार केली आणि त्यांनी श्रीकांत सुरेश पिनलवार (24) रा.मुगट ता.मुदखेड जि.नांदेड याला आदिलाबाद येथून ताब्यात घेतले.
पकडलेल्या मारेकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मागील 9 महिन्यापासून अलका बेंद्रे आणि श्रीकांत पिनलवार हे सोबत राहत होते. या दोघांची अगोदर कोठे तरी बस प्रवासात भेट झाली होती आणि ती प्रवास भेट प्रेमात बदलली आणि हे दोघे छत्रपती संभाजीनगर शहरात सोबत राहु लागले होते. त्या ठिकाणी सुध्दा श्रीकांतने काही मैत्रीणी बनवल्या आणि अलकाने सुध्दा काही मित्र बनविले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि श्रीकांतने 23 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव येथे राहत असलेल्या घरात तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुण्यावरून हिंगोलीकडे येणाऱ्या एका मालवाहु गाडीत ट्रॉली बॅगमध्ये प्रेत टाकून तो औंढा नागनाथ येथे आला. 24 डिसेंबरच्या पहाटे त्याने ते प्रेत दुसऱ्या एका ऍटोच्या माध्यमातून मसोबा मंदिराच्या पाठीमागे फेकून पसार झाला होता. सुतावरून स्वर्ग गाठण्याची ही कसरत हिंगोली पोलीसांनी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, हिंगोली ग्रामीण उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक अंबादास भुसारे यांनी हि कामगिरी करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक विकास पाटील, गणेश राहिले, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने, पोलीस उपनिरिक्षक माधव जिव्हारे, कपिल आगलावे, पोलीस अंमलदार पांडूरंग राठोड, कोंडीबा मगरे, विक्रम कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, आकाश टापरे,किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, हरीभाऊ गुंजकर, इमरान सिद्दीकी, शेख इकबाल, शेख मदार यांचे कौतुक केले आहे.
Post Views: 17