नऊ हल्ले, नऊ मृत्यू… आणि प्रत्येक वेळी तोच माणूस जिवंत! इराणमधील गूढ गद्दारी
राजकारण आणि भारताच्या इतिहासात अशी अनेक नावे प्रसिद्ध आहेत, जी आपल्या राज्याविरुद्ध बंड केल्यामुळे किंवा राज्याला धोका दिल्यामुळे कुप्रसिद्ध ठरली. त्यामध्ये छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांच्या काळातील सूर्याजी पिसाळ, टीपू सुलतानाच्या काळातील मीर सादिक, तसेच सिराज-उद-दौलाच्या काळातील मीर जाफर यांची नावे विशेषत्वाने घेतली जातात.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षातही अशाच प्रकारच्या एखाद्या “सूर्याजी पिसाळ”, “मीर सादिक” किंवा “मीर जाफर”सारख्या व्यक्तीमत्त्वाची चर्चा होत आहे. असे सांगितले जात आहे की इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे अशाच प्रकारचा विश्वासघात असू शकतो. या हल्ल्यात त्यांच्या सोबत जवळपास 40 मोठे नेते व अधिकारी मारले गेल्याचे सांगितले जाते, तसेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला.
या कथित विश्वासघातकी व्यक्तीचे नाव आयआरजीसी (IRGC) च्या कुद्स फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल इस्माईल कानी असे सांगितले जात आहे. काही अहवालांनुसार जनरल कानी यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या संपर्कात असताना अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले झाले. सुरुवातीला या घटना योगायोग समजल्या गेल्या; परंतु नंतर शंका निर्माण होऊ लागली की हा योगायोग नसावा.

असे सांगितले जाते की ते मुळात इस्रायली गुप्तहेर संस्था “मोसाद” चे एजंट असू शकतात. ते इराणच्या सैन्यात दाखल झाले, हळूहळू उच्चपदस्थांच्या विश्वासात गेले आणि महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभागी होऊ लागले. अनेक वेळा असे घडले की त्यांच्या उपस्थितीनंतर थोड्याच वेळात इराणी नेते, हिझबुल्ला किंवा हमासशी संबंधित नेत्यांवर हल्ले झाले. अशा घटनांनंतर ते काही काळ दिसेनासे होत आणि नंतर पुन्हा समोर येत.
एकदा इस्रायलच्या मोसादने संभाव्य लक्ष्यांची एक यादी जाहीर केली होती. त्या यादीत अनेक मोठ्या नेत्यांची नावे होती, परंतु जनरल इस्माईल कानी यांचे नाव त्यात नव्हते. त्यामुळेही संशय अधिक वाढू लागला.
जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा आणखी एक प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी अत्यंत मोजक्या लोकांना प्रवेश होता, त्या ठिकाणच्या पडलेल्या इमारतीमधील त्यांच्या मृतदेहाचा फोटो काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले गेले. त्यानंतरच ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केल्याची चर्चा झाली.
जर त्या ठिकाणी मोजक्या लोकांनाच जाण्याची परवानगी होती, तर तो फोटो बाहेर कसा गेला, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा “आतील गद्दार” असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली.
कुद्स फोर्स ही केवळ इराणमध्येच नव्हे तर इराणच्या बाहेरही काम करणारी विशेष लष्करी शाखा आहे. तिची ख्याती मोठी आहे. या फोर्सचे कमांडर पूर्वी जनरल कासिम सुलेमानी होते. 2020 मध्ये ते इराकला गेले असताना अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इस्माईल कानी यांना कुद्स फोर्सचे कमांडरपद देण्यात आले.
अलीकडे काही अरब प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की जनरल कानी यांना IRGCने ताब्यात घेतले आहे. काही अहवालांमध्ये त्यांना मृत्युदंड देण्यात आल्याचेही म्हटले जाते, तर काही अहवाल त्याला दुजोरा देत नाहीत. इराणकडून अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. काही लोक त्यांना “नऊ जीवांचा माणूस” असेही म्हणतात, कारण अनेक घटनांमध्ये ते उपस्थित होते आणि काही मिनिटांनंतर त्या ठिकाणी हल्ला झाला. अशा नऊ घटनांची चर्चा होत आहे.

उदाहरणार्थ, हिझबुल्लाचे नेते हसन नसरल्लाह, तसेच हमासचे प्रमुख इस्माईल हनियेह यांच्या मृत्यूशी संबंधित घटनांमध्येही त्यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला जातो. काही वेळा त्यांच्या मृत्यूच्या बातम्याही पसरल्या, पण काही दिवसांनी ते पुन्हा जिवंत दिसले.
या सर्व घटनांमुळे इराणमध्ये शंका निर्माण झाली की उच्च स्तरावरच कुणीतरी माहिती बाहेर देत आहे. जनरल कानी यांचे नाव इराण-इराक युद्धाच्या काळात पुढे आले होते. त्या काळात त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर लढा दिला होता आणि इराणसाठी मोठे योगदान दिले होते.
मात्र अली खामेनेई यांच्या कथित मृत्यूनंतर ते काही काळ सार्वजनिकरित्या दिसले नाहीत. त्यामुळे संशय अधिकच वाढला. काही अरब माध्यमांच्या मते इराणकडे त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत आणि म्हणूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काही अहवालांमध्ये असेही सांगितले जाते की मोसादचा एक एजंट पूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील उच्च पदापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत होता, पण नंतर त्याचा पर्दाफाश झाला.
एकूणच, असा दावा केला जात आहे की मोसादचा एखादा एजंट इराणमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि तोच महत्त्वाची माहिती बाहेर पाठवत आहे. त्याच माहितीच्या आधारे इराणमधील अनेक मोठ्या नेत्यांवर हल्ले झाले असल्याची चर्चा आहे.
आता सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे नवे नेतृत्व या परिस्थितीत कोणती नवी रणनीती आखते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
