नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाला महानगरपालिकेच्या वातानुकूलित दालनांत बसून अधिकारी वर्ग सफाई मोहिमांचे, कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे आणि भव्य कामांचे कितीही खोटे दावे करत असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भीषण आणि विदारक आहे. नांदेड शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची आज झालेली दुरवस्था पाहून डोळ्यांत पाणी येते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही अशी सफाई केली आणि तशी सफाई केली असे कागदी घोडे नाचवले जात असले, तरी प्रत्यक्ष गोदावरीच्या पात्रात आणि संपूर्ण नांदेड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शीख भाविकांचे दुःख आणि संतप्त प्रतिक्रिया नांदेड हे जगभरातील शीख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे. तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबच्या दर्शनासाठी आणि पवित्र गोदावरी नदीत स्नानासाठी दररोज जगभरातून हजारो शीख भाविक नांदेडमध्ये येतात. परंतु, गोदावरी घाटावर पोहोचल्यानंतर तिथली भयानक परिस्थिती पाहून या भाविकांनी अत्यंत दुःख आणि खेद व्यक्त केला आहे. दूरवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी थेट सवाल केला आहे की, ज्या पवित्र नदीच्या तीरावर आम्ही श्रद्धेने येतो, तिथे कचरा, विषारी पाणी आणि दुर्गंधी पाहायला मिळत आहे, अशा पद्धतीची सफाई असते काय? महानगरपालिका केवळ कागदावर आणि दाव्यांमध्येच सफाई करत असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
गोदावरी पात्राची विदारक स्थिती: विषारी पाणी आणि लाखो माशांचा मृत्यू प्रत्यक्षात गोदावरीच्या घाटांवर स्वच्छ पाणी उरलेलेच नसून संपूर्ण नदी कचऱ्याच्या ढिगाऱ्याने वेढली गेली आहे. नदीचे पाणी हिरव्या-काळ्या विषारी रंगात बदलले असून, प्लास्टिकच्या पिशव्या, जुने कपडे, पूजा साहित्य आणि घरगुती कचऱ्याने संपूर्ण पात्र साचले आहे. नदीच्या पात्रात सांडपाणी आणि प्रदूषण प्रचंड वाढल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पूर्णपणे संपले आहे, ज्यामुळे लाखो मासे मरून पाण्याचा पृष्ठभागावर तरंगत आहेत. सडलेला कचरा आणि मेलेल्या माशांमुळे घाटांवर एवढी भयंकर दुर्गंधी पसरली आहे की, तिथे काही मिनिटे उभे राहणेही नागरिकांना व भाविकांना कठीण झाले आहे.
ऑक्टोबर मध्येच जलकुंभीचा विळखा व साथीच्या रोगांची भीती दरवर्षी सामान्यतः कडक उन्हाळ्यात दिसणारी जलकुंभी यावर्षी अक्टोबर महिन्यातच संपूर्ण नदीच्या पात्रात वेगाने पसरू लागली आहे. येत्या ९ ते १० महिन्यांपर्यंत नदीत पाण्याचा नवीन प्रवाह येण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे जर आत्ताच तातडीने सफाई मोहीम राबवली गेली नाही, तर संपूर्ण गोदावरी नदी जलकुंभीच्या जाळ्यात अडकून ठप्प होईल आणि शहरात गंभीर आजार व आजारांची साथ पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
खाजगी यंत्रणा निष्फळ आणि नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत महानगरपालिकेने गोदावरीची आणि शहराची सफाई करण्यासाठी करोडो रुपये देऊन खाजगी यंत्रणा व कंत्राटदार नियुक्त केले आहेत. परंतु करोडो रुपये पाण्यात जाऊनही ही खाजगी यंत्रणा काहीही काम करत नाही, हेच गोदावरीच्या आणि शहराच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. शहरात निर्माण होणाऱ्या घाणीच्या साम्राज्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही ठोस सोय महानगरपालिकेकडे नाही. विशेष म्हणजे, मनपा सफाईवर करोडो रुपयांचा अर्थसंकल्प दाखवते; मात्र हकीकत अशी आहे की, शहरातील सर्व प्रमुख गंदे नाले कोणतीही प्रक्रिया न करता थेट गोदावरी नदीत सोडले जात आहेत.
नांदेड वाघाला महानगरपालिकेला इशारा नांदेडच्या गोदावरी नदीची ही रडवेली अवस्था प्रशासकीय निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. नांदेड वाघाला महानगरपालिकेने तात्काळ आपले खोटे दावे बाजूला ठेवून गोदावरीत सोडले जाणारे नाले बंद करावेत, खाजगी कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी आणि नदीपात्राची तसेच संपूर्ण शहराची युद्धपातळीवर सफाई करावी, अशी तीव्रतेजपालसिंघ खेड यांनी आणि नांदेडची जनता आणि भाविक करत आहेत.

Post Views: 3
