नांदेड – आई नंतर विद्यार्थी घडवण्यासाठी आई इतकीच माया लावणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवत असताना संस्कार, संस्कृती आणि नैतिकतेचे शिक्षण देणे अपेक्षित आहे. तरच उद्याचा समृद्ध समाज आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री रुचिरा बेटकर यांनी व्यक्त केले.
सहयोग एज्युकेशनल कॅम्पसच्या डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांचे सरस्वती निकेतन हायस्कूल नाईक नगर येथे अंतरपाठ सुरू आहेत. महिला दिनाचे औचित्य साधत भावी अध्यापकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी सरस्वती निकेतन हायस्कूलच्या सहशिक्षिका एच के डोंगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री रुचिरा बेटकर यांच्यासह प्रा. आम्रपाली भद्रे , प्रा. एम पी झुंजार, प्रा. व्ही.एस. मठपती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र अध्यापिका ऋतुजा जाधव हिने केले तर प्रास्ताविक साक्षी वाठोरे यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना कवयित्री रुचिका बेटकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांना शिकवणे आवश्यक आहे . भावनिक ,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेणे आवश्यक आहे . प्रत्येक शिक्षक हा अद्यावत असणे आवश्यक आहे. वर्तमान परिस्थिती समजून घेत असतानाच भविष्याचा वेध घेऊन अत्याधुनिक पद्धतीने ज्ञानदान करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आई, वडील आणि शिक्षकांचे ऋण फेडण्यासाठी उच्चशिक्षित होऊन स्वतः मोठे होऊन , इतरांना आधाराची सावली देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत रुचिरा बेटकर यांनी बिघडत चाललेली नैतिकता नीतिमत्ता याबद्दलही प्रखर मत व्यक्त केले . प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबाची सांस्कृतिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी वाडवडिलांनी ठरवून दिलेल्या सामाजिक नियमांचे पालन करावेत. समाजाला घातक ठरते असे कोणतेही कृती विद्यार्थ्यांनी करू नयेत. खास करून मुलींनी आपली, आपल्या कुटुंबाची पत आणि प्रतिष्ठा खराब होणार नाही याची जाणीव ठेवून सामाजिक जीवनात वर्तन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Post Views: 2
