मनोज जरांगे पाटलांनी अखेर डिफेंडर कार परत केली:अंतरवालीत पोहोचताच मालकाला फोन, नेमकं काय म्हणाले?



अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर प्रकृतीच्या कारणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थ आणि मराठा बांधवांशी संवाद साधला. याचदरम्यान त्यांच्या वापरातील चर्चेतील पांढऱ्या रंगाची डिफेंडर कार अखेर मालकाकडे परत करण्यात आली. मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या वापरासाठी एका मराठा बांधवाने ही डिफेंडर कार दिली होती. काही दिवसांपासून ही कार जरांगे पाटील यांच्या वापरात असल्याने तिची मोठी चर्चा झाली होती. कारवरून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही टीका आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, आता जरांगे पाटील यांनी स्वतः गाडी मालकाला फोन करून ती परत घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सुभाष भोसले यांची होती डिफेंडर ही डिफेंडर कार सुभाष भोसले यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी असून त्यांचा सराफा व्यवसाय आणि शेतीचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही कार वापरण्यासाठी दिली होती. दरम्यान, सुभाष भोसले यांच्याशी संबंधित काही चर्चांमुळेही गेल्या काही दिवसांत त्यांचे नाव चर्चेत आले होते. भोसले यांच्या कोलकाता येथील व्यवसायावर केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई केल्याची चर्चा होती. तसेच जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणी तपास यंत्रणांच्या कारवायांबाबतही चर्चा सुरू होती. त्यामुळे डिफेंडर कारच्या मालकाचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. डिफेंडरवरून टीका झाल्यानंतर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया डिफेंडर कार वापरत असल्यावरून टीका झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच यावर भूमिका स्पष्ट केली होती. आपण कोणत्या गाडीतून प्रवास करतो, यापेक्षा मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आपला संघर्ष महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले होते. डिफेंडरमधून फिरत असल्यावरून गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले होते. समाजातील लोकांचे प्रेम आणि पाठिंबा असल्यामुळे आपण कोणत्याही गाडीत बसलो तरी त्याचा इतरांनी गैरसमज करून घेऊ नये, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. समाजातील गोरगरीब मुलांच्या भविष्यासाठी आपला लढा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. अंतरवालीत पोहोचल्यानंतर भावनिक संवाद रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत पोहोचलेल्या जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनादरम्यान सहभागी झालेल्या सर्व बांधवांचे आभार मानत गावातील कोणत्याही व्यक्तीविषयी मनात राग किंवा नाराजी ठेवू नका, असे आवाहन केले. अंतरवाली सराटी हे केवळ आंदोलनाचे ठिकाण नसून आपल्या हक्कासाठी आणि गोरगरीबांच्या भविष्यासाठी लढण्याचे ठिकाण असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनासाठी सर्वांनी मोठा त्याग केला असून त्यामुळे एकमेकांना दोष देण्याऐवजी समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. ‘अंतरवाली आपल्यासाठी पंढरपूरसारखं’ यावेळी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीची तुलना पंढरपूरशी केली. ज्या पद्धतीने लोक पंढरपूरमध्ये जाऊन पांडुरंगासमोर आपले गाऱ्हाणे मांडतात, त्याचप्रमाणे अंतरवालीतही समाजातील लोक आपल्या वेदना आणि प्रश्न घेऊन येतात, असे त्यांनी सांगितले. अंतरवाली हे आपल्या राज्यातील गोरगरीब लेकरांच्या कल्याणासाठी लढण्याचे ठिकाण आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीविषयी मनात कटुता ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ‘मायलेकरासारखं नातं झालं’ आंदोलनाचा मंडप आणि व्यासपीठ काढल्यानंतर आपल्यालाही अंतरवालीत पूर्वीसारखे करमत नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. आंदोलनादरम्यान अंतरवाली आणि समाजातील बांधवांशी आपले मायलेकरासारखे घट्ट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे हे नाते सहज तुटणारे नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. आपण जिवंत असेपर्यंत अंतरवालीला कोणताही डाग लागू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. आंदोलनाचे स्वरूप बदलले असले तरी अंतरवालीशी आणि तेथील ग्रामस्थांशी असलेले आपले नाते कायम राहणार असल्याचा संदेश त्यांनी दिला. दरम्यान, अंतरवालीत परतल्यानंतर डिफेंडर कार मालकाला परत करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या कारचा मुद्दाही आता पुन्हा चर्चेत आला आहे. हेही वाचा… कमी पावसामुळे रबी हंगामाचे आव्हान:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची केंद्राकडे 1,000 कोटींची मागणी, 10 लाख ज्वारी बीज किट्सचीही मागणी महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा कमी आणि असमान पाऊस झाल्याने आगामी रबी हंगामात शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी असल्याने रबी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपये, सूक्ष्म सिंचनासाठी 500 कोटी रुपये आणि 10 लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्स उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *