टोळक्याने दहशत माजवून 23 वाहनांची तोडफोड:पुण्यात तळजाई वसाहतीत मध्यरात्रीची घटना, एकाला अटक




पुणे शहरात पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने २३ वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतीतील तळजाई वसाहतीत राहणाऱ्या एका तरुणाचा आरोपींशी वाद झाला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास तरुण तळजाई वसाहत परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली. तरुण त्यांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर, टोळके खंडाळे चौकात त्याचा पाठलाग करत आले. आरोपींनी कोयते आणि बांबू उगारून परिसरात दहशत माजवली. त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करत टेम्पोसह अनेक दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सुरू असताना भयभीत झालेल्या नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सहकारनगर पोलिसांनी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, वैयक्तिक वादातून ही घटना घडली असून, एकाला अटक केली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर तळजाई वसाहतीतील रहिवासी दहशतीखाली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यातही तळजाई वसाहतीत अशाच प्रकारे टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. वैयक्तिक वादातून तोडफोड तळजाई वसाहतीत टोळक्याने १५ ते १६ वाहनांची तोडफोड केली. वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. – मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *