![]()
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ५ हजार ८०८ क्विंटल सोयाबीनचे व्यवहार झाले. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५२५० ते ५४०० रुपयांचा दर मिळत असून, दरातील तेजीमुळे शेतकरी खाजगी बाजाराला प्राधान्य देत आहेत. यावर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करूनही अनेक सोयाबीन उत्पादकांनी आपले पीक वाचवले. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत सोयाबीन साठवून ठेवले होते. आता बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्यांनी विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आवक वाढली आहे. केंद्र शासनाने यावर्षी सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपये आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. बडनेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्रात यासाठी शासकीय खरेदी केंद्रही उघडण्यात आले आहे. मात्र, शासकीय खरेदीनंतर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने सोयाबीन उत्पादक खाजगी बाजारातच आपली विक्री करत आहेत. बुधवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ७ हजार ३०६ क्विंटल धान्याची आवक झाली. यात सोयाबीन ५८०८ क्विंटल, तूर १०२३ क्विंटल, मका ३२१ क्विंटल, हरभरा ९१ क्विंटल, तीळ ४४ क्विंटल, उडीद १३ क्विंटल आणि गहू ६ क्विंटल यांचा समावेश होता. ही सर्व आवक २०७ वाहनांमधून झाली. ज्वारी आणि मूगाची आवक झाली नाही. दरम्यान, ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसालाही सध्या चांगला भाव मिळत आहे. अमरावतीमध्ये कापसाचे भाव प्रतिक्विंटल ७९०० ते ८१०० रुपये असून, सरासरी दर ८००० रुपये प्रतिक्विंटल आहे. जिल्ह्याच्या काही भागांत हा दर ७९०० ते ८०५० रुपयांपर्यंत नोंदवला गेला. गतवर्षीच्या तुलनेत हे दर अधिक असल्याने कापूस उत्पादकही समाधानी आहेत. बाजारातील आवक आणि कापसाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.
अमरावती बाजारात सोयाबीनची आवक वाढली:दिवसभरात 5808 क्विंटलचे व्यवहार, दरात तेजी कायम
