मुखेडमध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; १३ ब्रास रेतीसह हायवा जप्त

मुखेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चांडोळा येथे विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा हायवा पकडून पोलिसांनी सुमारे ४५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांडोळा येथे विनापरवाना रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुखेडचे प्रभारी अधिकारी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत एमएच-४८ सीक्यू-९३३९ क्रमांकाचा हायवा थांबवून तपासणी केली. वाहनामध्ये अंदाजे १३ ब्रास रेती आढळून आली. संबंधितांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी व कागदपत्रांची चौकशी केली असता, वाहतूक अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे ४५ लाख रुपये किमतीचा हायवा आणि ६५ हजार रुपये किमतीची रेती असा एकूण ४५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी बळीराम आनंदा सूर्यवंशी (वय ३४, व्यवसाय चालक, रा. मारतळा, ता. लोहा) आणि हायवा मालक, नाव माहीत नाही, अशा दोन आरोपींविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुखेड पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुखेडचे पोलीस निरीक्षक कामठेवाड, पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस अंमलदार गिते, अमोल सुंडगे व पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *