कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

0
app_177746487469f1f62a68468_1000536479.jpg




प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या संख्येमुळे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी त्यांना सांगितल्या. शिर्डी,मनमाड,वैजापूर ,श्रीरामपूर,संगमनेर व नाशिक या शहरांना जोडणारे कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. याचबरोबर तीर्थक्षेत्र शिर्डी जवळ असल्यामुळे भाविकांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोपरगाव बसस्थानक महत्वाचे आहे. मात्र सध्या कोपरगाव बस आगारात बस संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. २०१९ पूर्वी आगारात एकूण ९० बस होत्या. आज ही संख्या कमी होवून ७२ वर आली आहे. यामध्ये एकूण ८ बस या १३ वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तसेच शालेय फेऱ्यांवर होत असल्यामुळे बस सेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची होणारी ओढाताण व येणाऱ्या अडचणींची दखल घेवून बस प्रवाशांचा व शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोपरगाव बस आगाराला तातडीने नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed