Bacchu Kadu | मोठी बातमी! बच्चू कडू थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंच्या भेटीला, शिवसेना प्रवेशाची शक्यता
Bacchu Kadu | आज, ३० एप्रिल २०२६ रोजी, विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून, त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाकडे आणि पक्ष विलीनीकरणाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कडूंची उमेदवारी आणि विलीनीकरणाची अट
शिवसेनेतील काही नेत्यांनी बच्चू कडू यांना पक्षाबाहेरून उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. उमेदवारी हवी असल्यास त्यांनी आपला ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ शिवसेनेत विलीन करावा, अशी भूमिका नेत्यांनी घेतली होती. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत:
आज सकाळी १० वाजता बच्चू कडू आपल्या पदाधिकाऱ्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत.मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर, आजच्या बैठकीत पक्ष प्रवेश आणि विलीनीकरणावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, ‘प्रहार जनशक्ती संघटना’ ही कायम राहील अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते आणि दुसरा उमेदवार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भातील शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक मध्येच सोडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी, दुसऱ्या जागेसाठी शीतल म्हात्रे आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. यापैकी एका नावावर आज शिक्कामोर्तब होईल.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल:
मेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: ३० एप्रिल २०२६ (आज)
उमेदवारी अर्जांची छाननी: २ मे २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: ४ मे २०२६
प्रत्यक्ष मतदान: १२ मे २०२६ (सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी आणि निकाल: १२ मे २०२६ (सायंकाळी ५ वाजता)
निवडणूक प्रक्रिया समाप्ती: १३ मे २०२६
या निवडणुकीत विधानपरिषदेचा एक आमदार निवडून आणण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे.
News Title: Bacchu Kadu join Shiv Sena Eknath Shinde MLC Election 2026
