![]()
भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या नाशिक येथील कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवणाऱ्या नऊ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत संशयितांना अटक केली आणि बुधवारी त्यांची भावली येथील घटनास्थळासह इगतपुरी शहरातून धिंड काढून कायद्याचा धाक दाखवला. सरकारी पक्षाने न्यायालयात संशयितांनी पूर्वनियोजित कट रचून गुन्हा केल्याचा दावा केला. गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे, तसेच फिर्यादीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने जप्त करणे बाकी असल्याने सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १८ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणात विशाल भटाटे, अनिकेत मानवेढे, अनिरुद्ध भागडे, सागर (लोकेश) गिते, विनोद बोराडे, सचिन आडोळे, अर्जुन आडोळे, देवीदास भगत आणि अजय दालभगत यांना अटक करण्यात आली असून, ते पोलिस कोठडीत आहेत, तर कैलास भागडे, आकाश भोईर आणि तुषार कडू हे मुख्य संशयित अद्याप फरार असून, त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. वदविल्या ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ घोषणा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी संशयितांना थेट भावली धरण परिसरात नेले. त्यानंतर इगतपुरी शहरातून त्यांची जाहीर धिंड काढण्यात आली. यावेळी संशयितांकडून “नाशिक जिल्हा… कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा वदवून घेण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिक व पर्यटकांनी स्वागत केले.
भावली धरणानजीक पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या 9 संशयितांची घटनास्थळी धिंड:काेर्टाने सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी, मुख्य संशयित अद्याप फरार
