‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा:शिवेंद्रसिंहराजेंचा राहुल गांधींवर निशाणा



निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याऐवजी काँग्रेसने आपल्या पराभवाची कारणे शोधून आत्मपरीक्षण करावे, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सातत्याने प्रश्न उपस्थित करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एसआयआरच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काँग्रेसकडून केले जाणारे आरोप आणि प्रत्यक्ष परिस्थिती यातील विसंगती समोर आली असल्याचा दावा त्यांनी केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एसआयआरची प्रक्रिया एकमताने सुरू असल्याचेही आयोगाने सांगितले आहे. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातून एक विशिष्ट राजकीय कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ विजयावेळी लोकशाहीचा विजय, पराभवानंतर आयोगावर प्रश्न? काँग्रेसच्या निवडणूक भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना शिवेंद्रसिंहराजेंनी कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या विजयाचा दाखला दिला. ‘‘काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर लोकशाहीचा विजय झाला, असे सांगितले जाते. मात्र पराभव झाल्यानंतर मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रणा किंवा निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला जातो. ही भूमिका योग्य नाही. काँग्रेसने आपल्या पराभवाची कारणे शोधून संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे,’’ असे ते म्हणाले. एसआयआरमध्ये सर्व पक्षांना सहभागी होण्याची संधी मतदार याद्यांच्या पुनरावलोकनासाठी सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरही शिवेंद्रसिंहराजेंनी भाष्य केले. मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याची संधी आहे. त्यामुळे या प्रक्रियेबाबत गैरसमज निर्माण करण्याऐवजी राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदार याद्यांमधील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. मतदार यादीच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया ही केवळ एका पक्षाशी संबंधित नसून निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा प्रक्रियेतील त्रुटी असल्यास त्या संबंधित यंत्रणेकडे मांडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. फॉर्म क्रमांक 6 वरूनही संभ्रम निर्माण केल्याचा आरोप फॉर्म क्रमांक 6 बाबतही संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शिवेंद्रसिंहराजेंनी केला. मतदार नोंदणी आणि मतदार यादीशी संबंधित प्रक्रियेबाबत उपलब्ध असलेल्या नियमांची माहिती घेऊनच राजकीय पक्षांनी भूमिका मांडावी, असे ते म्हणाले. संवैधानिक संस्थांवर आरोप करताना दुसरीकडे संविधानाचा उल्लेख करणे, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणूक आयोगासारख्या संस्थांबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यामागे ठोस तथ्य असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘जनतेचा कौल स्वीकारून आत्मपरीक्षण करा’ देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे, असा दावा करत शिवेंद्रसिंहराजेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करण्याऐवजी जनतेने दिलेला कौल स्वीकारून पक्षाने आपल्या संघटनात्मक आणि राजकीय कामगिरीचे परीक्षण करावे, असे ते म्हणाले. निवडणुकीतील यश-अपयशाचे विश्लेषण करताना केवळ निवडणूक यंत्रणेला जबाबदार धरण्याऐवजी पक्षाची संघटनात्मक ताकद, जनतेशी असलेला संपर्क आणि राजकीय रणनीती यांचा आढावा घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न’ कॅबिनेट सचिवांचे पत्र हे डेप्युटेशनवरील नियुक्त्यांशी संबंधित होते. मात्र या पत्राचा वेगळा अर्थ काढून विरोधकांकडून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला राजकीय पातळीवर थेट आव्हान देता येत नसल्याने काँग्रेसकडून विविध मुद्दे उपस्थित करून संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *