सत्यनारायणाच्या पूजेसाठी जाणाऱ्या रोहिल्यातील प्रौढाचा रस्त्यात मृत्यू:दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जागीच ठार




प्रतिनिधी | गारज वैजापूर तालुक्यातील गारज येथील टोलनाक्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी (४५, रा. रोहीला बु. जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. कुलकर्णी हे ताडपिंपळगाव येथे मामाकडे सत्यनारायण पूजेसाठी जात होते. गारज येथील नव्याने सुरू असलेल्या टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीचा (एमएच २० एल ३१३२) अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरली. दुचाकी सुमारे १५ फूट घसरली. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांनी धाव घेत दुचाकी बाजूला केली. मांसाचे तुकडे गोळा केले. शिऊर पोलिसांना माहिती दिली. मृताच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल करणाऱ्याने विचारले, “गुरु पूजेसाठी कधी येणार?’ नागरिकांनी सांगितले, “गुरुचा अपघात झाला, ते जागीच मरण पावले.’ हे ऐकून अंगावर शहारे आले. कुलकर्णी हे पूजाअर्चा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. गावकऱ्यांनी वाळूमाफियांविरोधात संताप व्यक्त केला. काहींनी अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा संशय व्यक्त केला. सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांब यांनी पोलिस कर्मचारी सविता वरपे यांना घटनास्थळी पाठवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला होता. पुढील तपास बिट जमादार गणेश गोरक्ष करत आहेत. वाळूमाफियांविरोधात नागरिकांमधून संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव दिगंबर मोरे यांनी वाळूमाफियांविरोधात संताप व्यक्त केला. रस्त्यावर सांडलेल्या वाळूबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी. अन्यथा गावकरी आंदोलन करतील, असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *