इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा
![]()
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले. यामुळे कंपनीचे अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बायोमास बँक शेतकऱ्यांकडून तणस खरेदी करून त्याचे चौकोनी गठ्ठे तयार करते, जे इथेनॉल निर्मितीसाठी विविध कारखान्यांकडे पाठवले जातात. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास परिसरातील शेतात कचरा जाळला जात असताना, वाऱ्याच्या वेगामुळे आगीची ठिणगी उडून तणसाच्या मोठ्या साठ्यावर पडली. तणस अत्यंत कोरडे असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच मौदा आणि रामटेक येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी खासगी पाण्याचे टँकरही मागवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी अनेक तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रशासनाकडून आगीच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
