आमदार रासने यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट:ज्ञानेश्वर पालखी मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित

0
8c564887-7475-4633-8260-0fa2f27ba1cd_1777471973730.jpg




संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील भवानी पेठ येथील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेता, पालखी सोहळा प्रमुखांकडून मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू होता. यामुळे स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आमदार रासने यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही परंपरा कायम ठेवण्याची विनंती केली. पुणेकरांसाठी ही परंपरा अत्यंत भावनिक आणि महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्तही उपस्थित होते आणि त्यांनीही आपले मत मांडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासन आणि संबंधित घटकांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भवानी पेठेतील मुक्कामाबाबत लवकरच अनुकूल निर्णय अपेक्षित आहे. याबाबत बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा पुणेकरांच्या भावनांशी घट्ट जोडलेली आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. परंपरा अबाधित ठेवत सोहळा अधिक सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed