![]()
अमरावती शहरात मकर संक्रांतीनिमित्त सुरू असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांदरम्यान दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बडनेरा आणि राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयपथनगर, एसओएस शाळेजवळ घडली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ५७ वर्षीय महिला घराजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्याने चेनचे पेंडंट खाली पडले, मात्र चोरट्यांनी उर्वरित चेन घेऊन पळ काढला. या चेनची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. दुसरी घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तविहार कॉलनी परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ३८ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसोबत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटला. महिलेने आरडाओरड करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पसार झाले. विशेष म्हणजे, या दोन्ही घटना सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने घडल्या आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती समान असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बडनेरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस विभागाने महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हळदी-कुंकू तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सोन्याचे दागिने घालणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सोबत कुणी नसल्यास महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे आणि आवश्यक असल्यास अधिक काळजी घ्यावी, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.
अमरावतीत दोन महिलांच्या चेन स्नॅचिंग, 1.60 लाखांचा ऐवज लंपास:हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून परतताना अर्ध्या तासात दोन घटना
