देगलूर पोलिसांची कार्यवाही;शेळगाव शिवारात तिर्रट जुगारावर छापा;ईदगाह परिसरात मटका जुगाराचा पर्दाफाश

देगलूर (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्याच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत शेळगाव ते कारेगाव रस्त्यालगत शेळगाव शिवारात पैशांवर तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी काही जण जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले.

या प्रकरणात इरन्ना भाईकटे (वय ७०), अर्जुन परमेशु माधवाड (वय ३१), परमेशुमाटलवार (वय ३६), धुळप्पा मालगोंडा पारशेवार (वय ४८), शादुल शमशुशेख, साईनाथ गंगाराम माधवाड, राजुपाटील, विजय पाटील, अनिल सगरोळे आणि राजू चोंडे यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे. यातील काही जण शेळगाव येथील रहिवासी असून, काही जण सांगवी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ८ हजार ८३० रुपये रोख, अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली, चार मोबाईल फोन आणि पत्ते असा एकूण ५ लाख ८ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईदगाह परिसरात मटका जुगाराचा पर्दाफाश

दुसऱ्या कारवाईत देगलूर येथील ईदगाह परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. देगलूर गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मैसनवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी मोबाईलवर श्रीदेवी व टाइम बाजार नावाचा मटका जुगार घेत असल्याच्या आरोपावरून माधव परमेशु तलवारे (वय ५०, रा. आचेगाव, ता. देगलूर), तिरुपती मालबा तलवारे (वय ३६, रा. आचेगाव, ता. देगलूर) आणि सुशील गंगाधर बोडके (रा. बोरगाव, ता. देगलूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. सुशील बोडके याच्याकडे मटक्याची आकडेमोड दिली जात असल्याचे पोलीस प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. या कारवाईत ३ हजार ३३० रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकूण २३ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, देगलूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मैसनवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे तसेच पोलीस अंमलदार शेख अब्दुल बारी, पंडित बळदे, शिवाजी आडबे, माधव मरगेवाड आणि मोहम्मद इब्रान यांनी सहभाग घेतला. अवैध जुगार, मटका व इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, अशा हालचालींची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *