![]()
खासदार बळवंतराव वानखडे यांनी अचलपूर येथे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष खुर्शीदा बानो अताशाह आणि स्वीकृत नगरसेवक अ. मुजीब यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना वानखडे यांनी काँग्रेस पक्ष शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस हा नेहमीच जनतेच्या पाठिशी उभा राहणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा पक्ष आहे. याच कारणामुळे जनतेने पक्षाला सक्रिय पाठिंबा देत जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष पदे दिली आहेत, असे वानखडे म्हणाले. हा सत्कार सोहळा खासदार बळवंतराव वानखडे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर अचलपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत झोडपे, परतवाडा शहर अध्यक्ष राहुल गवई, तालुका अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, माजी नगरसेवक मेहरूलाभाई, आत्ताशाहभाई आदी मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दर्यापूर आणि चिखलदरा येथील नगराध्यक्षपद जिंकले आहे. याशिवाय धारणी, चिखलदरा, दर्यापूर आणि अचलपूर येथे उपनगराध्यक्ष पदेही प्राप्त केली आहेत. खासदार वानखडे यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, काँग्रेस हा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेला जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक गोष्टींची कमतरता असतानाही काँग्रेसने औद्योगिक क्रांती, धवल क्रांती, कृषी क्रांती आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती साधली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा आणि सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने चार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते, त्यापैकी दोन ठिकाणी थेट विजय मिळवला. उर्वरित ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने उपाध्यक्षपदही काँग्रेसकडेच आले. हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक असून, दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्षांसह काँग्रेस हा जिल्ह्यात सर्वाधिक उपनगराध्यक्षपद प्राप्त करणारा पहिला पक्ष ठरला आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.
अचलपूर उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्यांचा सत्कार:खासदार बळवंतराव वानखडे म्हणाले- काँग्रेस शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करेल
