वसमत शहरालगत भरधाव कार कालव्यात पडली:दैव बलवत्तर म्हणून कार मधील दोघेही बालंबाल बचावले




वसमत ते परभणी मार्गावर वसमत शहरापासून काही अंतरावर भरधाव वेगाने धावणारी कार कालव्यात पडल्याने रविवारी तारीख 18 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने कार मधील दोघेही बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील शिवराज रामराव तिमेवार (३०) हे त्यांचा मित्र विनायक जगदीश दवणे (२०) यांच्यासोबत त्यांच्या कारने वसमत कडून खांडेगाव कडे निघाले होते. भरधा वेगाने धावणारी कार वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कालव्याजवळ आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. विशेष म्हणजे कालव्याला असलेले कठडे तुटलेले असल्यामुळे कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान सदरील कार सुमारे पंधरा ते वीस फूट खोल कालव्यात कोसळली. कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे शिवराज व विनायक दोघांनी प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर पडले. कार पासून काही अंतरावर येऊन ते कालव्यावर आले. सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र किरकोळ मुक्कामार लागल्यामुळे दोघेही उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघेही रुग्णालयातून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, बेंगाळ, प्रशांत मुंढे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान कालव्यात पडलेली कार क्रेनची मदत घेऊन बाहेर काढली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशीर झाल्यामुळे कार बाहेर काढण्याचे काम सोमवारी तारीख १९ हाती घेतली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची पोलिसांनी स्पष्ट केले. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अपघातातील या दोघांना आज आल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *