![]()
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करण्याची तयारी केली आहे. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये तापमानात वाढ होऊन उकाडा
.
खंड का पडला?
अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यात गेले चार-पाच दिवस पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता जम्मू, डेहराडून, पटना ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, महाराष्ट्रातही पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खडकवासला धरण साखळीत ५८ टक्के पाणीसाठा झाल्याने पुण्यावरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे, ही एक जमेची बाजू आहे.
भारतीय हवामान विभागाने आज (बुधवार, 15 जुलै) जारी केलेल्या अलर्टनुसार, राज्यातील हवामान खालीलप्रमाणे असेल…
कोकण आणि मुंबई (यलो अलर्ट): कोकण विभागाच्या दिशेने ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर तुलनेने कमी असेल. मात्र, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. 17 जुलैनंतर पुण्यात पावसाचा जोर वाढेल.
उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश: नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नाशिकमध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर अहिल्यानगरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील.
मराठवाडा: बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 15 ते 16 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. धाराशिव आणि लातूरमध्ये हलका पाऊस राहील.
विदर्भ: विदर्भात आज प्रामुख्याने कोरडे वातावरण राहील. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह कोणत्याही जिल्ह्यासाठी आज अलर्ट देण्यात आलेला नाही. 16 जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर वाढेल.
२० जुलैनंतर मुसळधार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय होणार असून, मुसळधार पावसाला सुरुवात होईल. अकोला आणि विदर्भातील काही भागांत पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके, विशेषतः सोयाबीन आणि कापूस कोमेजू लागला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या स्प्रिंकलरचा (तुषार सिंचन) आधार घ्यावा लागत आहे. पाऊस लांबल्यास काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही ओढावू शकते, त्यामुळे येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हवामान विभागाच्या या नवीन अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 20 जुलैनंतर अपेक्षित असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल, तसेच पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळेल, अशीही आशा आहे.
