![]()
मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज के. पुरोहित यांचे पार्थिव उद्या, रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दक्षिण मुंबईतील अजेय नेतृत्व राज के. पुरोहित हे मुंबई भाजपमधील एक सामर्थ्यशाली नाव होते. विशेषतः दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा राजकीय दबदबा होता. मुंबईतील उत्तर भारतीय समुदायाचे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विधिमंडळातील त्यांचा अभ्यास आणि प्रशासनावरील पकड यामुळे त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत केली होती. राजकीय वारसा आणि प्रवास नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांनी वॉर्ड क्रमांक २२१ मधून विजय मिळवून आपला राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आहे. आपल्या मुलाच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच राज पुरोहित यांचे जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज पुरोहित राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, तरीही पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि मार्गदर्शनासाठी ते नेहमीच सक्रिय राहिले. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि मुंबईतील जनतेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भाजपचा अभ्यासू चेहरा हरपला:मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन, 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
