शिंदेंच्या ‘होम ग्राउंड’वर भाजपची खेळी; विरोधात बसण्याची तयारी:शिंदेंना 75, तर भाजपला 28 जागा, तरीही भाजप नाराज




ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व गाजवले असले तरी युतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने आता थेट ‘विरोधात बसण्याची’ तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर अंकुश हवा,’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी थेट संघर्षाचे संकेत दिले आहेत. ठाण्यातील १३१ जागांपैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकल्या आहेत. भाजपला २८ जागांवर यश मिळाले असून शरद पवार गटाने १२, अजित पवार गटाने ९ आणि उद्धव ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचाही पराभव झाला. त्यामुळे ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपची सत्तेतील वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होईल असे म्हटले जात होते. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व असले तरी “सत्ता अमर्याद नसावी’ म्हणत भाजप शिंदेंच्या प्रभावावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महापौरपदासाठी स्वतःहून न जाण्याचा पवित्रा घेऊन भाजपने सत्तेत सन्मानजनक वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी खेळली आहे. राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर “शरण’ न जाता आक्रमक विरोधकाची भूमिका घेत भाजपने आपली भविष्यातील विस्ताराची रणनीती स्पष्ट केली आहे. महापौरपदासाठी चर्चा करायला जाणार नाही महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने स्पष्ट केले आहे की ते महापौरपदाच्या चर्चेसाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत. “त्यांना (शिवसेनेला) चर्चा करायची असेल तर ते येतील, आम्ही जाणार नाही,’ असे म्हणत भाजपने आपला कडक पवित्रा जाहीर केला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर कुणाचे तरी नियंत्रण हवे,’ या विधानामुळे ठाण्याच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे. एकूणच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. मात्र भाजपच्या या भूमिकेवर शिंदे गटाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जागावाटपावरून सुरू झालेला हा सुप्त संघर्ष आता सत्ता स्थापनेबाबत टोकाला पोहोचला असल्याचेही दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू, भाजप आमदारांचा पवित्रा भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. केळकर म्हणाले की, “आम्ही ४० जागा लढवल्या आणि २८ जागांवर यश मिळवले. २०१७ च्या तुलनेत आमच्या ५ जागा वाढल्या आहेत. आम्ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करू. वेळ पडली तर विरोधात बसायलाही आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे. भाजपच्या या भूमिकेवर आता ठाण्यातील शिंदेसेनेचे स्थानिक पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपची युती नकोची होती भूमिका ठाण्यात निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती नको अशीच भूमिका घेतली होती. भाजपच्या १८ प्रांत अध्यक्षांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना पत्र पाठवले होते. मात्र, भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार युतीत निवडणुका लढवण्यात आल्या. आता निकालानंतर पुन्हा भाजपचा विरोधी सूर आल्याने भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध संपले नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी स्थानिक स्तरावर प्रचंड दबाव असल्याने, युतीमधील ही अंतर्गत धुसफूस उघडपणे चव्हाट्यावर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *