![]()
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत भारतीय जनता पक्षामध्ये मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी केली आहे. ” आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला. नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या शेवटच्या पाच दिवसांत उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार करून पक्षाशी गद्दारी केली,” असा खळबळजनक आरोप या उमेदवारांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांपैकी भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी भाजपला युवा स्वाभिमानी पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात थेट नवनीत राणा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. नेमके काय म्हटले पत्रात? ‘भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या, असा आरोप भाजपच्या २२ उमेदवारांनी पत्रात केला आहे. भविष्यात अमरावतीत पक्षाचा नायनाट करतील “नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला, असा आरोपही या उमेदवारांनी केला. नवनीत राणांच्या गद्दारीने आमचा पराभव आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी झोकून काम केलं.. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला स्टार प्रचारक’ भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी गद्दारी करून केला, असेही या पत्रात म्हटले आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या? या पत्रावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते, असे नवनीत राणा यांनी म्हटले. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे त्या म्हणाल्या. … म्हणून रवी राणांनी उमेदवार उभे केले विकास करणारे व्यक्ती म्हणून रवी राणा यांची ओळख आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारांनी त्यांचे उमेदवार निवडून दिले आहेत. युवा स्वाभिमान यांच्या सोबत भाजपची युती तुटली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री बावनकुळे आमच्या सोबत होते. १६-१६ वर्ष सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रवी राणा यांनी उमेदवार उभे केले होते, असे स्पष्टीकरण नवनीत राणा यांनी दिले. … तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते अमरावतीमधील ज्या उमेदवारांना निवडायचे होते त्यांनाच लोकांनी निवडून दिले. भाजपमध्ये तिकीट वाटपात थोडा घोळ झाला होता, त्यामुळे जागा कमी निवडून आल्या ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे तिकीट मिळाले असते तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला:त्यांना पक्षातून काढा, अमरावतीतील 22 पराभूत उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
