नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मरखेल पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी दारूची वाहतूक करणारी टाटा इंडिगो कार पकडून एकूण ₹२ लाख २३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १३ जुलै रोजी रात्री मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व त्यांचे पथक अवैध धंद्यांवर गस्त घालत असताना माळेगाव–करडखेड फाटा मार्गावरील शिवणी फाटा परिसरात एमएच-१४-एफसी-३२९९ क्रमांकाच्या टाटा इंडिगो कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पंचांसमक्ष सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता डिक्कीत खाकी रंगाच्या सहा बॉक्समध्ये भिंगरी संत्रा ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण २८८ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ₹२३,०४०, तर कारची किंमत ₹२ लाख असून असा एकूण ₹२,२३,०४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहनचालक बालाजी मलकागौड खुनेवाड (वय ५०, रा. करडखेड, ता. देगलूर, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई), (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व मरखेल पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, अवैध दारू विक्री, साठा किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Post Views: 239
