राजकीय हालचालींना प्रचंड वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा




राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या राजकीय गाठीभेटी सुरू आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांपाठोपाठ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतल्याने, शरद पवार गटदेखील ‘एनडीए’मध्ये सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे. अजितदादा गटाची पुन्हा अर्थ खात्यावर नजर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वित्त (अर्थ) विभागाची जोरदार मागणी केली जात असल्याचे समजते. आगामी निवडणुका आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जयंत पाटलांची एन्ट्री अन् चर्चांना उधाण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जयंत पाटील यांच्या या अचानक झालेल्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शरद पवार गटही सत्ताधारी ‘एनडीए’मध्ये सामील होण्याच्या तयारीत तर नाही ना? असा कयास आता राजकीय तज्ज्ञांकडून लावला जात आहे. फडणवीसांच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच वेळी चर्चेला बसले होते. शरद पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून जयंत पाटील, तर अजित पवार गटाच्या वतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात फडणवीसांच्या उपस्थितीत अत्यंत सविस्तर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली ते मुंबई राजकीय खलबते
महाराष्ट्रात या अत्यंत महत्त्वपूर्ण गाठीभेटी सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीत एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातही महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. दिल्ली ते मुंबई सुरू असलेल्या या समांतर राजकीय घडामोडींमुळे लवकरच राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठा निर्णय किंवा राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. ४५ मिनिटांची बैठक आणि विकासकामांवर मंथन अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल पाऊण तास ही महत्त्वाची बैठक चालली. या बैठकीचे नेतृत्व स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील होते. ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती कशी देता येईल, यावर या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सखोल चर्चा करण्यात आली. केंद्राकडून निधीची कमतरता नाही; शाहांची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीला आलेल्या या सर्व खासदारांचे स्वागत केले. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध मोठे प्रकल्प, आवश्यक असणारा निधी आणि मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, अशी मागणी या खासदारांनी शाहांकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही मदतीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अमित शहा यांनी या खासदारांना दिली. ‘पावसासोबतच चांगल्या गोष्टींची सुरुवात’ या सदिच्छा भेटीनंतर बाहेर आल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एक अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. योगायोगाने आज दिल्लीत चांगला पाऊसही पडला आहे. त्यामुळे या पावसामुळे दिल्लीत अतिशय सकारात्मक वातावरणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (बुधवारी) दिल्लीतच एक विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय राजकीय खलबते झाली? तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेतून काही मोठे संकेत देणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देणे, शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढणे आणि राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, महायुती सरकारने याच धोरणावर भर दिला आहे. विशेषतः शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जमाफीच्या निकषांमध्ये केलेले बदल आणि एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्याचे निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. सविस्तर वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *