![]()
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर डिग्र फाटा येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हयातील कयाधू, पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी महसूल व पोलिस विभागाची पथके कार्यरत ठेवली आहे. या पथकाकडून दररोज वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सेनगाव, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यात महसूल व पोलिस पथकाकडून कारवाईचा धडका सुरु झाला असून मागील आठ दिवसांत तब्बल 15 पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वाहन चालकासह वाहन मालकावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे त्यांच्या पथकासह शुक्रवारी ता. 16 हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरून जात होते. यावेळी डिग्रस फाट्या जवळ एक टिप्पर दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर थांबवून तपासणी केली असता टिप्पर मध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर चालकाची चौकशी केली. यामध्ये त्याने वाळू वाहतूकीच्या पावत्या तसेच परवाना नसल्याचे स्पष्ट केले. यावरून सदर टिप्पर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्राामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे महसूल विभागाच्या पथकाने सांगितले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
डिग्रस फाटावर अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले:महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु
