![]()
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळताना दिसत असल्या तरी, या निकालातील सर्वात ठळक बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने केलेली अभूतपूर्व मुसंडी. भाजप व पारंपरिक प्रादेशिक पक्षांबरोबरच आता एमआयएम हा महापालिका राजकारणातील एक महत्त्वाचा घटक ठरत असल्याचं या निकालांमधून अधोरेखित झालं आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी झाले असून, हा आकडा पक्षासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. एमआयएमची कामगिरी केवळ मराठवाडा किंवा मुस्लिमबहुल भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या पक्षाने मुंबईसारख्या महानगरातही ठळक उपस्थिती नोंदवली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील काही प्रभागांमध्ये एमआयएमने थेट दिग्गज आणि पारंपरिक राजकीय गटांचे गणित बिघडवले आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरात एमआयएमने विजय मिळवत मोठा राजकीय धक्का दिला आहे. मुंबईतील हा निकाल पाहता, एमआयएम आता केवळ पर्यायी पक्ष न राहता थेट स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगरपालिकेत एमआयएमने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 134 मधून मेहजबिन खान, 136 मधून जमीर कुरेशी, 137 मधून समीर पटेल, 138 मधून रोशन शेख, 139 मधून शबाना शेख आणि 145 मधून खैरुनिसा हुसेन यांचा समावेश आहे. या निकालांमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः समाजवादी पक्षाला मिळालेल्या धक्क्यामुळे अल्पसंख्याक मतदारांच्या राजकीय पसंतीत बदल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपातळीवर पाहता, एमआयएमने 29 महापालिकांपैकी 13 महापालिकांमध्ये एकूण 95 जागांवर विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएमने 24 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, या शहरात उमेदवार निवडीदरम्यान मोठा गदारोळ झाला होता. तरीही त्या सर्व वादांना मागे टाकत एमआयएमने प्रभावी कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली आहे. मराठवाड्यातील हा विजय ओवेसींसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मालेगाव महानगरपालिकेत एमआयएमने 20 उमेदवार विजयी करून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. याशिवाय सोलापूर, धुळे आणि नांदेड या तीन महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी 8 जागांवर एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या तीन शहरांमधून एकूण 24 नगरसेवक निवडून येणं ही पक्षाची संघटनात्मक ताकद दर्शवणारी बाब मानली जात आहे. या निकालांमध्ये समाजवादी पक्षाला मागे टाकत एमआयएमने स्पष्ट सरशी साधली असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. इतर शहरांचाही विचार करता, अमरावतीमध्ये एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत, तर ठाण्यात 5 आणि नागपुरात 4 जागांवर एमआयएमने यश मिळवलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतही एमआयएमने पहिल्यांदाच विजयाचं खातं उघडलं असून, हा निकाल पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विविध भौगोलिक भागांमध्ये मिळालेलं हे यश एमआयएमच्या वाढत्या प्रभावाचं स्पष्ट द्योतक मानलं जात आहे. वाद, संघर्ष आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवरही लक्षणीय यश दरम्यान, या यशामागे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची राज्यभरातील आक्रमक प्रचारशैली महत्त्वाची ठरल्याचं बोललं जात आहे. ओवेसी यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला होता. अकोल्यातील सभेदरम्यान मोठा गदारोळ झाला होता, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला होता. या सर्व वाद, संघर्ष आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवरही एमआयएमने महाराष्ट्रात लक्षणीय यश मिळवलं आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका राजकारणात एमआयएमची भूमिका अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाड्यापासून मुंबईपर्यंत ओवेसींची मुसंडी, MIMचा मोठा उदय:29 पैकी 13 महापालिकांमध्ये एकूण 95 उमेदवार विजयी
