![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर, विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेतील कथित गैरव्यवहारावर सडकून टीका केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी शिवसेनेची बाजू स्पष्ट केली. लाडकी बहीण योजनेत ‘स्टेट कॅप्चर’चा गुन्हा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर राऊत यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या योजनेसाठी 14 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तब्बल 92 लाख बोगस लाभार्थी असल्याचा दावा राऊत यांनी केला. कोणतीही केवायसी किंवा छाननी न करता 29 हजार पुरुष आणि साडेचार हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी (जे आधीच सरकारी पगार घेतात) या योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेतला आहे. तुमच्या बापाचे पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशांचा केलेला हा सुमारे 3,515 कोटी रुपयांचा अपहार आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी योजना नाही, आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे पैसे अडकले आहेत आणि तुम्ही 3515 कोटी रुपये मतं विकत घ्यायला लुटता, हे तुमच्या बापाचे पैसे आहेत का?” असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हा पैसा कसा वसूल करणार? असा सवाल करत, राऊत यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळावर तसेच तत्कालीन मुख्य सचिव, अर्थसचिव आणि महिला व बालकल्याण सचिव यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “या अधिकाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून या पैशांची वसुली व्हायला हवी,” असे ते म्हणाले. याप्रकरणी शिवसेना राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार असून, गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाह्य शक्तींचा हस्तक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) काही आमदारांच्या नाराजीवर आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदावरील आक्षेपांवर राऊत यांनी भूमिका मांडली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून शशिकांत शिंदे त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट हे ‘अमित शहांचे पक्ष’ आहेत, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत कुरबुरींवर शिवसेनेने बोलण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. या सर्व घडामोडींबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या सर्वच पक्ष अडचणीतून प्रवास करत आहेत. देशातील विरोधी आणि प्रादेशिक पक्षांना काम करू न देण्यासाठी मोदी-शहा या ‘बाह्य शक्तींकडून’ जाणीवपूर्वक या अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. जयंत पाटील कधीही जातीयवादी शक्तींसोबत जाणार नाहीत जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीच्या चर्चेवर बोलताना राऊत यांनी जयंत पाटील यांच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. “जयंतराव पाटील हे शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. ते क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा असलेल्या भागातून येतात. ते जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जातील, असे त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही.” त्यांच्यासोबत रोहित पवार, आर. आर. पाटील यांच्या चिरंजीवांसारखे पुरोगामी विचारांचे आमदार आहेत. त्यामुळे ते कोणत्याही गटात सामील होऊन वेगळा विचार करणार नाहीत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. संबंधित बातमी वाचा… सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
मतं विकत घेण्यासाठी 'लाडकी बहीण' योजनेत 3515 कोटींचा अपहार:संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांचा घणाघात
