पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसेन यांना 'तिहाई' महोत्सवातून आदरांजली:पुण्यात संतूर, तबला, सारंगीची जुगलबंदी; १७ जानेवारीला मैफल




पुण्यात ‘तिहाई महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, ज्यातून महान संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली जाईल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ‘अ शततंत्री मीडिया’ यांच्या वतीने हा महोत्सव होत आहे. यात संतूर, सारंगी, खरताल, मृदुंग आणि तबला या वाद्यांची जुगलबंदी रसिकांना ऐकण्याची संधी मिळेल. ही अनोखी मैफल शनिवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात होणार आहे. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि प्रसिद्ध संतूर वादक पं. मदन ओक यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आहे. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर या मैफिलीचे निवेदन करतील. पं. मदन ओक यांनी सांगितले की, “भारतीय शास्त्रीय संगीतात ‘तिहाई’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. याच संकल्पनेतून ‘तिहाई – द हेरिटेज ऑफ इंडियन आर्ट्स अँड म्युझिक’ या महोत्सवाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा जगभरात पोहोचावा या उद्देशाने २०१४ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधून सुरू झालेला हा प्रवास आता माझ्या मायभूमीत, म्हणजेच पुण्यातून भारतात पदार्पण करत आहे.” ओक पुढे म्हणाले, “हा महोत्सव केवळ एक सांगीतिक कार्यक्रम नसून, महान संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली आहे. संतूरला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारे माझे गुरू पं. शिवकुमार शर्मा आणि तबल्यावरील प्रभुत्वाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसेन या जोडीने संगीत विश्वात एक सुवर्णयुग निर्माण केले. या दोन दिग्गजांनी संतूर आणि तबल्याचा अजरामर स्वरसंवाद घडवला. तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न ‘तिहाई’ महोत्सव करत आहे.” कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध तबला वादक उस्ताद फझल कुरेशी आणि पं. मदन ओक यांची तबला आणि संतूर वादनाची जुगलबंदी रंगणार आहे. पं. शिवकुमार शर्मा आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संतूर व तबला वादनाच्या अनेक गाजलेल्या मैफलींची आठवण ताजी करणारी ही मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे. दुसऱ्या सत्रात दिलशाद खाँ (सारंगी), खेटे खाँ (खरताल), अनंतकृष्णन (मृदुंग) आणि उस्ताद फझल कुरेशी (तबला) यांची भारतीय आणि पाश्चात्य वादनाची मैफल होणार आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांनी ‘मास्टर्स ऑफ पर्कशन’च्या माध्यमातून तालवाद्यांचे प्रयोग जागतिक स्तरावर नेले आहेत. त्याचीच झलक या मैफलीतून रसिकांना अनुभता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *