![]()
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, मतदान आणि मतमोजणीच्या गदारोळाआधीच काही महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा निकाल ठरला होता. कारण काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या बिनविरोध निवडींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा आणि वादही रंगले होते. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकूण अनेक उमेदवार मतदान न होता थेट विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण राज्यात सर्वाधिक बिनविरोध उमेदवार याच महानगरपालिकेतून निवडून आले आहेत. एका बाजूला लोकशाहीत जनतेचा कौल महत्त्वाचा मानला जात असताना, दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांचा बिनविरोध विजय होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे. त्यामुळे खरंच ही लोकशाहीची प्रक्रिया आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी मोठी आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांच्यासह प्रभाग 24 (ब) मधून ज्योती पाटील, प्रभाग 18 (अ) मधून रेखा चौधरी, प्रभाग 26 (अ) मधून मुकंद तथा विशू पेडणेकर, प्रभाग 27 (ड) मधून महेश पाटील, प्रभाग 19 (क) मधून साई शेलार, प्रभाग 23 (अ) मधून दिपेश म्हात्रे, प्रभाग 23 (ड) मधून जयेश म्हात्रे, प्रभाग 23 (क) मधून हर्षदा भोईर, प्रभाग 19 (ब) मधून डॉ. सुनिता पाटील, प्रभाग 19 (अ) मधून पूजा म्हात्रे, प्रभाग 30 (अ) मधून रविना माळी, पॅनेल 27 (अ) मधून मंदा पाटील, पॅनेल 28 (अ) मधून हर्षल मोरे, तसेच प्रभाग 26 (क) मधून आसावरी नवरे आणि प्रभाग 26 (ब) मधून रंजना पेणकर यांचा समावेश आहे. याशिवाय राजन मराठे आणि रेश्मा निचल हे उमेदवारही बिनविरोध विजयी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेतही काही प्रभागांत उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक 14 (ड) मधून शितल ढमाले, प्रभाग 17 (ब) मधून राम रेपाळे, प्रभाग 18 (क) मधून जयश्री फाटक, प्रभाग 17 (अ) मधून एकता भोईर आणि प्रभाग 5 (अ) मधून सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली. त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेत प्रभाग 18 (अ) मधून अश्विनी सन्नी फुटाणकर, प्रभाग 18 (ब) मधून दीपा दीपक मढवी, प्रभाग 18 (क) मधून अबूसूद अशफाक अहमद शेख, प्रभाग 16 (अ) मधून परेश (राजू) चौघुले, प्रभाग 23 (ब) मधून भारती हनुमान चौधरी आणि वॉर्ड क्रमांक 17 (ब) मधून सुमीत पाटील हे उमेदवार थेट विजयी घोषित करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेतही बिनविरोध निवडींची संख्या लक्षणीय आहे. प्रभाग क्रमांक 9 (अ) मधून मनोज चौधरी, 9 (ब) मधून प्रतिभा देशमुख, 12 (ब) मधून उज्वला बेंडाळे, प्रभाग 7 मधून विशाल भोळे, 16 (अ) मधून विरेंद्र खडके, 7 (अ) मधून दीपमाला काळे, 13 (क) मधून वैशाली पाटील, 7(ब) मधून अंकिता पाटील, 2 (अ) मधून सागर सोनवणे, 19 (अ) मधून रेखा पाटील, 19 (ब) मधून विक्रम सोनवणे आणि 18 (अ) मधून गौरव सोनवणे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय अहिल्यानगर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 11 मधून कुमारसिंह वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे यांचा समावेश आहे. धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 17 (ब) मधून सुरेखा उगले, प्रभाग 1 (अ) मधून उज्ज्वला भोसले आणि प्रभाग 6 (ब) मधून ज्योत्स्ना पाटील या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे विजयी झाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 10 (ब) मधून सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय झाला. राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल पनवेल महानगरपालिकेतही अनेक प्रभागांत निवडणूक न होता निकाल लागला. प्रभाग 18 (ब) मधून नितीन पाटील, तसेच नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले हे उमेदवार विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व बिनविरोध निवडींमुळे आज जाहीर होणाऱ्या अंतिम निकालांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. एकीकडे मुंबईसारख्या महानगरपालिकेचा निकाल चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आधीच ठरलेले निकाल लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे आजचा निकाल केवळ विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे जाहीर करणारा नसून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
महायुतीचा निवडणूकपूर्व धमाका:बिनविरोध नगरसेवकांची संपूर्ण राज्याची यादी एका क्लिकवर; कुठे-कुठे बिनविरोध निवडून आले?
