![]()
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून गावाचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता 16 गाव भेटीमध्ये केले आहे. हिंगोली तालुक्यातील वडद, एकांबा, बोडखी, अंबाळा, अंबाडा तांडा, बोंडाळा, मोप, कनेरगाव, फाळेगाव या गावांना आज भेटी देण्यात आल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, आसावरी काळे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, नायब तहसीलदार कोकरे, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गाव स्वच्छ व सुंदर करणे, गावात प्लास्टिक बंदी राबविणे, कर वसुली शंभर टक्के करणे, घरकुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. गावाचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन अंतर्गत नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या नरेगा कायद्यात बदल करून ६५ टक्के जलसंवर्धन कामे, २५ टक्के गावातील मूलभूत सोयीसुविधा निर्माण, तसेच उर्वरित आजीविका कामे, पूरप्रतिबंधात्मक कामे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी योग्य आराखडा तयार करून कामांची निवड करण्याच्या सूचना त्यांनी केल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात लखपती दीदी म्हणून जास्तीत जास्त महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी यावेळी केले. या दौऱ्यादरम्यान हिंगोली तालुक्यातील वरील संबंधित ग्रामीण भागातील कृषि योजना, रस्ते, पाणी पुरवठा योजना, घरकुल आवास योजना, नरेगा कामे, पाणंद रस्ते, पंतप्रधान अदर्श ग्राम योजना, दलित वस्तीचे कामे, स्वच्छ भारत, आदिवासी आश्रम शाळा, समाजकल्याण वसतीगृहे, लघु पाटबंधारे तलाव, रेशनदुकान तपासणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, आभाकार्ड, ‘उमेद’च्या योजना, पी.एम. सूर्यघर मोफत वीज योजनांबाबतची तपासणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे केली. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा किनगाव येथे शुभारंभ:ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन
