![]()
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का मात्र काहीसा घसरल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली असताना, पुण्यात मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचे फ्लेक्स लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 32 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचे ‘विजयी’ झाल्याचे सांगणारे फलक त्यांच्या समर्थकांनी मतदान संपताच लावले आहेत. अधिकृत निकाल हाती येण्यापूर्वीच अशा प्रकारे विजयाचा गुलाल उधळल्याने आणि फ्लेक्सबाजी केल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला असून, कार्यकर्त्यांमधील अतिउत्साह यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 32 चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांचे हे विजयी फलक झळकले असून, त्यावर त्यांना चक्क ‘भावी आमदार’ म्हणून संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधी असे फलक लावू नका, असे सक्त आदेश दिले असतानाही कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोडके यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच केलेला हा विजयोत्सवाचा प्रयत्न पुण्यात सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.
निकालाआधीच भाजपकडून पुण्यात विजयाचे फ्लेक्स!:सचिन दोडकेंचा थेट 'भावी आमदार' म्हणून उल्लेख, बॅनरबाजी ठरली चर्चेचा विषय
