पंजाबहून नांदेडला आणून एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या पंजाब येथील दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-पंजाबच्या नशामुक्ती केंद्रातून नांदेड येथे आलेल्या दोन युवकांनी त्यांना नांदेडला आणणाऱ्या व्यक्तीवर केलेल्या जिवघेण्या हल्यासाठी तदर्थ न्यायाधीशांनी त्या दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.16 जून 2022 रोजी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या दिलबागसिंघ अवतारसिंघ (46) या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार मी फेथ फाऊंडेशन नशामुक्ती केंद्र कट्टीवाला जि.सोलन (हिमाचल प्रदेश) हे चालवतो. सन 2020 मध्ये माझ्या नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी गुरमनराजसिंघ दलजितसिंघ (32) रा.बोराटीवाला महोल्ला, सेक्टर 78, सोहाना, एसएएसनगर पंजाब हा आला. त्यानंतर सन 2021 मध्ये सुखज्योतसिंघ चरणपालसिंघ बरार (28) रा.बाबामोनीदा गुरुद्वारा धल्लोर जि.मोगा पंजाब हा आला. हे दोघे तेथे आपली व्यसनाची सवय सोडण्यासाठी आले होते म्हणून त्यांची माझी ओळख होती.
तिन महिन्यापुर्वी हे दोघे माझ्याकडे आले आम्हाला हजुर साहिब यांच्या दर्शनासाठी नांदेडला घेवून जा असे म्हणाले. त्यानुसार 11 जून 2022 रोजी आम्ही महोली येथून नांदेडकडे निघालो. 12 जून 2022 रोजी नांदेडला पोहचलो आणि नांदेडमध्ये भ.ाई दयासिंघ यात्रीनिवास येथे खोली क्रमांक 908 मध्ये थांबलो. नांदेडला पोहचल्यावर या दोघांनी मला नशाकरण्यासाठी पैसे मागून त्रास देण्यासाठी सुरू केले. 14 जून 2022 रोजी आम्ही जेवन करून आपल्या कक्षात आलो आणि गप्पा मारत असतांना पिझा खाण्यासाठी माझेकडून घेवून दोघे बाहेर गेले. मी माझ्या गळ्यातील कृपाण काढून टेबलवर ठेवले आणि झोपलो. रात्री 1 वाजता माझ्या पायावर काही दबाव आहे याचा भास झाल्याने मला जाग आली. तेंव्हा पाहिले की, गुरमनराजसिंघ माझ्या पायावर बसला होता आणि माझ्याच कृपाणीने माझ्यावर हल्ला करत असे म्हणत होता की, आम्हाला पैसे देत नाहीस काय? मी कसा तरी त्याच्या तावडीतून सुटलो. तेंव्हा सुखज्योतसिंघने सुध्दा गुरमनराजसिंघकडून कृपाण घेवून माझ्या मानेवर हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत मी ओरडत बाहेर पडलो. मी 9 व्या मजल्यावर पळत खाली तळमजल्यावर आलो. तेंव्हा तुला मारुन टाकण्यासाठीच नांदेडला आणले असल्याचे ते दोघे सांगत होते. भाई दयासिंघ यात्रीनिवास येथील सुरक्षा रक्षकांनी मला रुग्णालयात दाखल केले. या दोघांनी मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34 नुसार गुरमनराजसिंघ आणि सुखज्योतसिंघ विरुध्द गुन्हा क्रमांक 212/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला.
शिवराज जमदडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार गुरमनराजसिंघ दलजितसिंघ (32) आणि सुखज्योतसिंघ चरणपालसिंघ बरार (28) या दोघांविरुध्द खटला क्रमांक 194/2022 सुरू झाला. या खटल्यात एकूण 10 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तदर्थ न्यायाधीशांनी या दोघांना 10 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी बाजू मांडली. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.
Post Views: 821