खडसे साहेबांनी पक्षासाठी जीव लावून काम केलं:पुनरागमनाच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांची मोठी प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदावरही स्पष्टच बोलले




भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “भारतीय जनता पक्ष वाढवण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एकनाथ खडसे हे एक आहेत. त्यांनी पक्षासाठी जीव लावून काम केले,” असे म्हणत मुनगंटीवार यांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला. मात्र, खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर, उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर, लाडकी बहीण योजनेवरील वाद, वारकरी अपघात आणि इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. ‘खडसे पक्षासाठी जीव लावून काम करणाऱ्या नेत्यांपैकी एक’ एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भाजपमध्ये परतण्याची ऑफर आल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “भारतीय जनता पक्ष वाढवण्यात अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यापैकी माननीय खडसे साहेबांचेही मोठे योगदान आहे. काही अडचणी निर्माण झाल्या, पण त्यांनी अनेक वर्षे पक्षाच्या विस्तारासाठी जीव लावून काम केले.” ते पुढे म्हणाले, “अमितभाईंनी त्यांच्याशी काही चर्चा केली असेल का, याची मला माहिती नाही. पण मी प्रदेशाध्यक्ष असताना खडसे साहेब विरोधी पक्षनेते होते. ते जानदार आणि शानदार स्वभावाचे नेते होते. कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा सन्मान होता.” ‘परत आले तर स्वागत, निर्णय राष्ट्रीय नेतृत्वाचा’ खडसे यांच्या संभाव्य पुनरागमनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “ते पक्षाबाहेर गेले तेव्हादेखील मला वाईट वाटले होते. पक्ष मोठा होईल, यात शंका नाही. हजारो कार्यकर्ते मेहनत करतात. पण आपल्या घरातील लोक बाहेर जाणे योग्य नव्हते. आता ते परत आले तर त्यांचे स्वागतच होईल. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेणार आहे.” मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर प्रतिक्रिया राज्यात मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून काम केले असून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, ही आमची सदिच्छा आहे.” बच्चू कडू, संजय राऊत आणि इतर नेत्यांकडून वेगवेगळ्या नावांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होत असल्याबाबत ते म्हणाले, “प्रत्येकाला आपापल्या आवडत्या नेत्याबद्दल प्रेम असते. सोशल मीडियावर गेलात तर 20 ते 25 मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार त्यांच्या समर्थकांनी तयार केले आहेत. इच्छा व्यक्त करणे गैर नाही.” उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरही भाष्य 18 जुलै रोजी उद्धव ठाकरे नागपुरात राम मंदिरात आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “मंदिर कोणत्याही पक्षाचे, व्यक्तीचे किंवा जातीचे नसते. प्रभू राम हे सर्वांचे आहेत. उद्धव ठाकरेच काय, सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा कोणताही नागरिक रामाचे नाव घेऊ शकतो. मंदिरात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.” ते पुढे म्हणाले, “राम हा या देशाची आस्था, अस्मिता आणि प्राण आहे. प्रभू रामाचे नाव घेतल्याने प्रत्येकाचे जीवन सुखी आणि समाधानी होते.” वारकरी अपघातांबाबत चिंता वारकऱ्यांच्या अपघातांच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. “दरवर्षी अशा घटना होणे योग्य नाही. आर्थिक मदत दिली जाते, पण त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती परत येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करायला हव्यात.” लाडकी बहीण योजनेवरील वादावर प्रतिक्रिया लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची नावे कमी झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले. “92 लाख नावे कमी झाली असतील तर त्यामागे ई-केवायसी पूर्ण न होणे हे कारण असू शकते. पात्र महिलांना न्याय मिळावा यासाठी ई-केवायसीची मुदत वाढवण्याची गरज आहे.” दरम्यान, खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, “हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. पोलिस चौकशीत सत्य समोर येईल. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.” भाजपच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? मुंबईतील भाजपच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पक्षविस्तार, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी प्रश्न, कर्जमुक्तीचा लाभ, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होणार असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पक्ष सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *