![]()
काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुणे महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांना
.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीने सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कदम बोलत होते. या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, काँग्रेस नेते विरेंद्र किराड, अमीर शेख, यशराज पारखी, सुनील शिंदे आणि प्राची दुधाने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विश्वजीत कदम यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. यंदाच्या मनपा निवडणुकीमुळे नागरिकांना आपला आवाज मांडण्याची संधी मिळत आहे, मात्र महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. खालच्या पातळीवरील टीका करूनही सत्तेत एकत्र राहून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे शहरातील अनेक मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, मनपा निवडणूक उशिरा झाल्याने प्रशासक राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला.
कदम पुढे म्हणाले की, केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसत होते, मात्र काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे, असे त्यांनी नमूद केले.
महायुतीतील पक्षांकडून तिजोरी आपली असल्याचे दावे केले जात आहेत, मात्र तिजोरीतील पैसा जनतेचा असून जनताच खरी मालक आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात महिलांची सुरक्षितता ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना कदम यांनी सांगितले की, पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही पक्षाच्या आदेशाने त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. सध्या ते सांगलीत आमदार म्हणून कार्यरत असून भविष्यातही सांगलीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
