भाजपच्या कथनी अन् करणीत फरक:मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर 5 महिला नेत्या, पण एकीलाही बोलण्याची संधी नाही; काँग्रेसची टीका

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-19t16_1776672611.png




काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कथनी अन् करणीत फरक आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला 5 महिला नेत्या हजर होत्या. पण त्यापैकी एकाही महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रृणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत जोरदार पलटवार केला. महिलांची उपस्थिती केवळ दिखाऊपणाची विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपची कथनी आणि करनी. भाजपचा महिलांबाबत कळवळा किती दिखाऊ स्वरूपाचा आहे हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. मंचावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, विधान परिषदेच्या महिला उपसभापती, राज्यसभेच्या महिला खासदार, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उपस्थित असताना बोललं कोण? केवळ देवेंद्र फडणवीस… मंचावर बसलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी नाही, केवळ दिखाऊ उपस्थिती.
मोदींचे भाषण आचारसंहिता भंग करणारे उल्लेखनीय बाब म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी रविवारी महिला आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग असल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks