आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

0
730-x-548-new-2026-04-20t132537142_1776671940.jpg




गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागला असून, त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मिडल-ईस्टमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी संकटाचा फटका भारतातील अनेक भागांना बसत असून, सूरतमध्ये त्याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. उद्योगधंदे बंद पडत असून, मजुरांना रोजगार गमवावा लागत आहे, असे त्यांनी नमूद केले. सूरतमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो मजुरांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईमुळे स्ट्रीट फूड विक्रेते, छोटे हॉटेल्स आणि ढाबे बंद पडले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, मोठ्या संख्येने कामगारांना आपापल्या गावी परतण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर दिसून आला. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो मजूर आणि प्रवासी स्टेशनवर जमा झाले होते. या प्रचंड गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या घटनेने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. रोहिणी खडसे यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सूरतमधील दृश्ये अत्यंत वेदनादायक आहेत. गॅस टंचाईमुळे मजुरांच्या हातून रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावले गेले आहेत. हजारो लोक आपल्या कुटुंबासह परत जाताना दिसत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतही त्यांनी इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे शहरांमध्येही गॅस टंचाईमुळे हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याचे प्रकार घडले होते. मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी आलेल्या तरुणांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ही परिस्थिती सूरतसारखीच होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सूरतसारखीच अवस्था रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, परिस्थिती अत्यंत गंभीर असताना सरकार निष्क्रिय असल्याचे दिसत आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सूरतसारखीच अवस्था निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारने तात्काळ पावले उचलून गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि मजुरांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks