![]()
पदे बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात आणि काळ पुढे सरकतो. मात्र भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, माया आणि जिव्हाळा कायम तसाच राहतो. याच भावनेचा प्रत्यय रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी चोपडा येथे आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणी निर्जलाताई देशमुख आणि सुशीलाताई गुजर यांच्या घरी जाऊन अत्यंत कौटुंबिक व आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधन साजरे केले. बहिणींनी त्यांचे औक्षण करून मनगटावर राखी बांधली आणि उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशासाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री पाटील यांनीही बहिणींना भेटवस्तू देत आपला स्नेह व्यक्त केला. यावेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, “राजकारणात पद कितीही मोठे मिळाले आणि जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरी बहिणीसाठी भाऊ हा कायम भाऊच असतो. मनगटावर बांधलेला राखीचा धागा छोटा असला, तरी त्यात बालपणाच्या असंख्य आठवणी, आई-वडिलांचे संस्कार आणि बहिणीची आयुष्यभराची माया गुंफलेली असते. बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील खरी श्रीमंती आहे.” रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबत सण साजरा करण्याची परंपरा पालकमंत्री पाटील यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. सार्वजनिक जीवनातील धावपळ आणि मंत्रीपदाच्या व्यस्ततेतही कुटुंबीयांसाठी वेळ काढत नात्यांमधील जिव्हाळा जपण्याला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले आहे. “वय वाढते, जबाबदाऱ्या वाढतात; पण बहिणीच्या हातून राखी बांधून घेताना मन पुन्हा बालपणात जाते,” अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. रक्षाबंधनाचा हा कौटुंबिक सोहळा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आठवणी आणि संस्कारांची वीण अधिक घट्ट करणारा क्षण ठरला. माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव उभा- गुलाबराव पाटील “आयुष्यात मला माझ्या सख्ख्या बहिणींच्या मायेबरोबरच सार्वजनिक आणि राजकीय जीवनात असंख्य माता-भगिनींचे प्रेम व आशीर्वाद लाभले. अनेकांनी मला मंत्री म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील भाऊ म्हणून प्रेम दिले. हा विश्वास माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे. राखीचा प्रत्येक धागा मला या प्रेमाची आणि नात्याची जाणीव करून देतो. माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भावनिक ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी नगरसेवक आबा पाटील, राजेंद्र पाटील, मोतीआप्पा पाटील, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन्ही बहिणींच्या घरी कुटुंबीय एकत्र आल्याने वातावरणात आपुलकी आणि जिव्हाळा भरून राहिला होता. भाऊ-बहीण आणि परिवारातील सदस्यांच्या या स्नेहपूर्ण भेटीने रक्षाबंधनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
'पद कितीही मोठे असले तरी बहिणीसाठी मी भाऊच!':पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात बहिणींच्या घरी जाऊन साजरे केले रक्षाबंधन
Previous Articleजेव्हा बहिणींनी संजय दत्तला कारागृहात राखी बांधली:रक्षाबंधनला बहिणींना भेट म्हणून दिले होते चहा-नाश्त्याचे 2-2 रुपयांचे कूपन
Next Article India-US Javelin Anti-Tank Missile Deal
