शेतीत यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसून त्याला अचूक नियोजन, शास्त्रीय अभ्यास आणि संकटांशी भिडण्याची जिद्द असावी लागते. सलग तीन वर्षे तेल्या आणि मऱ्यासारख्या घातक रोगांमुळे बागेचे झालेले नुकसान, विहिरीचे तळ गाठलेले पाणी आणि नैराश्याची दाट सावली… अशा अतोनात प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानत मालेगाव तालुक्यातील विराणे येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रदीप लोटन पगार यांनी सेंद्रिय स्लरीचे अचूक तांत्रिक गणित शोधून काढत आणि पाण्यासाठी स्वतःच्या ट्रॅक्टर-टँकरची सोय केली अन् अवघ्या ३० गुंठ्यांच्या (पाऊण एकर) अल्प क्षेत्रावर तब्बल चार लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. एका पाऊण एकरात तब्बल २ एकरांच्या तोडीस ५ टन डाळिंबाचे उत्पादन घेत त्यांनी संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा वस्तुपाठ ठेवला आहे. सलग तीन वर्षांच्या अपयशानंतर बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा विचार पगार यांच्या मनात आला होता. मात्र, कृषीदूत निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी रासायनिक खतांना पूर्ण छेद दिला. २०० लिटर पाण्यासाठी १० किलो देशी गाईचे शेण, २ किलो गूळ, गोमूत्र आणि पीएसबी व केएमबी बॅक्टेरिया यांचे अचूक प्रमाण वापरून त्यांनी सेंद्रिय स्लरी तयार केली. ही स्लरी ड्रिपने न देता डब्याने प्रत्येक झाडाला १-१ लिटर ड्रिंचिंग करून दिली. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून रोगप्रतिकारशक्ती बळकट झाली आणि बाग पूर्णपणे रोगमुक्त होऊन बहरली. दरम्यान, याबाबत बोलताना पगार म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ बांधावर उभे न राहता स्वतः शेतात उतरून कष्ट केले पाहिजेत. मजुरांवर अवलंबून न राहता स्वतः दररोज राबल्यास आणि अपयशाने न खचता सेंद्रिय तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती शंभर टक्के परवडते. संयम, सातत्य आणि प्रामाणिक मेहनत ठेवल्यास शेती नक्कीच समृद्धी आणि यश देते. उत्पन्न आणि खर्चाचे गणित प्रदीप पगार यांनी अवघ्या ३० गुंठ्यांतील २४० झाडांतून तब्बल ५ टन (५००० किलो) डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले. बाजारपेठेत प्रति किलो ९१ ते ९५ रुपये एवढा उच्च भाव मिळाल्याने त्यांना ४ लाख ५० हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळाले. या प्रयोगात सेंद्रिय स्लरी व उपचारांसाठी सुमारे ३५,००० आणि टँकरच्या पाण्यासाठी १५,००० असा एकूण ५० हजार रुपयांचा खर्च झाला. सर्व खर्च वजा जाता त्यांना ४ लाखांचा निव्वळ नफा मिळाला.
—————————-
शेतकरी मोबाइल नंबर : 9545662516
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%