नांदेड (प्रतिनिधी) -: भारतामध्ये श्रावण शुद्ध पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि स्नेहाचा सण म्हणजेच रक्षाबंधन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजपर्यंत हा सण प्रामुख्याने बहीण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचे, संरक्षणाचे प्रतीक मानला गेला आहे. मात्र, यंदा नांदेडमध्ये या सणाला एक अत्यंत अनोखा आणि संवेदनशील रस्ता सुरक्षेचा सामाजिक पैलू पाहायला मिळाला. नांदेड शहर वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि सेफर इंडियन रोड्स यांच्या संयुक्त विद्यमाने रोड सेफ्टी राखी-२०२६ या अभिनव जनजागृती उपक्रमाचे आयोजन वजिराबाद चौक पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ करण्यात आले.
वाहनधारकांना रस्ता सुरक्षेची राखी: या अनोख्या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी स्वतः रस्ता सुरक्षा अशा अभिनव पद्धतीने वाहनधारकांना राख्या बांधल्याचे पाहून तेथील नागरिक आणि विशेषतः महिलांना खूप मोठे आश्चर्य वाटत होते. महिलांसाठी हा एक अतिशय सुखद धक्का होता की पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर येऊन राख्या बांधत आहेत! मात्र, जेव्हा त्यांना या रोड सेफ्टी रक्षाबंधनाचा खरा अर्थ म्हणजेच अमूल्य मानवी जीवांचे रक्षण करणे’ हा रस्ता सुरक्षेचा उदात्त संदेश समजला, तेव्हा महिलांसह उपस्थितांनी आश्चर्याने तोंडात बोटे टाकली. प्रत्येक चालकाचा जीव त्यांच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचा आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रत्येकाच्या मनाला थेट भिडला. सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम संपूर्ण शहरात प्रचंड आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

अमूल्य जीव वाचवणे हेच खरे कर्तव्य – पोलीस अधीक्षकांचे आवाहन: याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांचा आदर करण्याचे आवाहन केले जीवघेणे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, बहुतांश जीवघेणे अपघात हे मानवी चुका तसेच रस्ते सुरक्षेच्या नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घडतात. त्यामुळे नागरिकांनी रस्ता सुरक्षेबाबतच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या आपल्या कुटुंबीय व प्रियजनांपर्यंत पोहोचवाव्यात.
त्यांनी नागरिकांना आणि पालकांना पुढील महत्त्वाचे आवाहन केले:
- पालकांसाठी कडक इशारा: पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना योग्य वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि वैध वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळेपर्यंत कोणतेही वाहन चालविण्यास अजिबात प्रोत्साहन देऊ नये.
- पादचाऱ्यांची सुरक्षा: पादचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नेहमी पदपथांचा (फूटपाथचा) वापर करावा.
- प्रशासकीय पावले: शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी नांदेड शहर वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे.
वाहतूक पोलीस आणि सामाजिक संस्थांचे कौतुक: रक्षाबंधनाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचा अत्यंत मोलाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणारा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच सेफर इंडियन रोड्सच्या सदस्यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास वाहतूक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, सेफर इंडियन रोड्सचे सदस्य घनशाम ओझा, महेश तिवारी, सोनू उपाध्याय, अंबादास जोशी, तरुण तिवारी, सिमरन तिवारी, राजश्री अडबलवार, वरुण तिवारी, सय्यद जैद अली, नेताल तिवारी, सृष्टी उपाध्याय, राघव तिवारी यांच्यासह नांदेड शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समाजाला नवा मार्ग दाखवणारा उपक्रम: रक्षाबंधनाच्या सणाला केवळ कौटुंबिक मर्यादेत न ठेवता, त्याला रस्ता सुरक्षा आणि मानवी जीवांचे रक्षण या व्यापक संकल्पनेशी जोडणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजजागृती करणारा ठरला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
