हिंगोली (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करण्यासाठी पोलीस–नागरिकांमधील संवाद वाढवून लोकाभिमुख कामकाज याद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेत आहेत. तसेच तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजून घेत त्यांचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिनांक २७ ऑगस्ट रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतला. त्यानंतर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी ‘जनसंवाद’ साधण्यात आला. यावेळी एकूण नऊ तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उपमहानिरीक्षक कडे सादर केले.या अर्जांमध्ये मालमत्ता विषयक वाद, दाखल गुन्ह्यांचा तपास, सायबर फसवणूक, पोलीस संरक्षण आदी विविध स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश होता. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा जलद निपटारा करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच संवेदना ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. जनसंवाद उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार असल्याचेही प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या जनसंवाद कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्रीणिक लोडा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी जनसंवाद उपक्रम प्रभावी माध्यम ठरत असल्याचे दिसून येत आहे.