[ads1]
![]()
घरातील गंभीर आजारपण चुटकीसरशी बरे करण्याचे आणि देवघराखाली गाडलेले कोट्यवधींचे गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल 4 लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. भोंदूबाबांनी घरातच मांडलेल्या अघोरी पूजेचा आणि फसवणुकीचा संपूर्ण थरार घरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात बब्बू गुरू, पम्मी गुरूसह एकूण 5 जणांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रिणीच्या मध्यस्थीने जाळ्यात ओढले मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 परिसरात पीडित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. कौटुंबिक अडचणी आणि घरातील सततच्या आजारपणामुळे महिला मानसिक तणावाखाली होती. या विवंचनेचा गैरफायदा घेत पीडितेच्या एका मैत्रिणीने तिची ओळख बब्बू गुरू आणि पम्मी गुरू नावाच्या भोंदूबाबांशी करून दिली. भोंदूबाबांनी महिलेच्या घरातील देवघराखाली पूर्वजांचे गुप्तधन गाडलेले असून घरात मोठी बाधा असल्याचे सांगितले. “आम्ही अघोरी विधी करून घरातील सर्व आजारपण दूर पळवून लावू आणि देवघराखालील गुप्तधन काढून तुम्हाला श्रीमंत करू,” अशी थाप मारून त्यांनी महिलेचा पूर्ण विश्वास संपादन केला. देवघराखाली अघोरी विधी; रोख 4 लाखांसह सोन्याचे दागिने हडपले गुप्तधन बाहेर काढण्याच्या नावाखाली आरोपींनी महिलेच्या घरातच देवघरासमोर अघोरी पूजेचा बनाव मांडला. पूजेच्या विधीसाठी आणि गुप्तधनाच्या ‘शुद्धीकरणा’साठी भोंदूबाबांनी महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 4 लाख रुपयांची रोख रक्कम आणि अंगावरील मौल्यवान सोन्याचे दागिने काढून घेतले. अघोरी पूजा आणि मंत्रोच्चार संपल्यानंतरही घरात कोणतेही गुप्तधन निघाले नाही आणि आजारपणही दूर झाले नाही. आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आपले पैसे आणि दागिने परत मागितले. त्यावर आरोपी बब्बू गुरू व त्याच्या साथीदारांनी पैशांचा अपहार करत महिलेला व तिच्या कुटुंबीयांना थेट जिवे मारण्याची धमकी दिली. सीसीटीव्ही फुटेज समोर येताच पोलिसांची चक्रे फिरली फसवणूक आणि धमकीनंतर भयभीत झालेल्या पीडित महिलेने न्यायासाठी तात्काळ हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला सुरुवातीला पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. मात्र, देवघराखाली सुरू असलेल्या अघोरी पूजेचे, लिंबू-टाचण्या व विधीचे दृश्य घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य वाढल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईची सूत्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी बब्बू गुरू, पम्मी गुरू यांच्यासह एकूण 5 जणांवर भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, धमकावणे तसेच ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा, 2013’ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. नागरिकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन आपली फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने डोळे उघडले असून, “माझ्यासारखे कोणीही संकटकाळात अशा भोंदू बाबांच्या, बुवाबाजीच्या किंवा गुप्तधनाच्या भुलथापांना बळी पडू नये,” असे भावनिक आवाहन केले आहे. हिल लाईन पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक तपासणी करत असून, फरार झालेल्या सर्व भोंदूबाबांचा आणि त्यांच्या साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. —————- हेही वाचा… विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर ‘सी शोअर शाइन 2026’: अजय देवगण, अमृता फडणवीस आणि पालिका आयुक्तांकडून स्वच्छता मोहीम गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर साचलेला कचरा व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रसिद्ध जुहू चौपाटीवर ‘दिव्यज फाऊंडेशन’, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी शोअर शाइन २०२६’ या विशेष बीच क्लीन-अप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सामाजिक कार्यकर्त्या व दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, दिविजा फडणवीस यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चौपाटीवर उतरून श्रमदान केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad