![]()
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २०० ते २५० शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा शिवरस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी तसेच शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा अतिरिक्त खर्च होत होता. आता रस्ता खुला झाल्याने शेतीची कामे आणि मालवाहतूक अधिक सुलभ होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. रस्ता मोकळा करण्याच्या कारवाईदरम्यान लासलगावच्या मंडळाधिकारी रूपाली सावळे, खडक माळेगावचे ग्राममहसूल अधिकारी जनार्दन उशीर, महसूल सेवक जयश्री पवार, पोलीस कर्मचारी गोसावी व कांदळकर, पोलीस पाटील वैशाली बाजारे, पोलीस पाटील शंकर वाघ तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गारे उपस्थित होते. परिसरातील शेतकरी खातेदारांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत कोणताही वाद न होता ही कार्यवाही यशस्वी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रश्न मार्गी शांततेत आणि सामंजस्याने झालेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षांची रस्त्याची कोंडी अखेर फुटली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या पुढाकारासह शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने सर्व स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा
