BJP Yuva Swabhiman Alliance Break BJP Supports Independent Candidate | अमरावतीत राजकीय उलथापालथ: रवी राणांच्या युवा स्वाभिमानला मोठा धक्का, भाजपचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; साईनगरमध्ये बिग फाईट – Amravati News



अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये असलेली युती आता केवळ नावापुरतीच उरली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मध्ये भाजपने अधिकृत युती असतानाही चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती आहे. प्रभाग क्रमांक १८ ही जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आली होती. तिथे युवा स्वाभिमानने स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपने रणनीती बदलत अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा दिलेल्या या पाठिंब्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अमरावतीत रवी राणा यांनी ८७ पैकी ४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे आता युतीमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत.

भाजपला मतांच्या विभाजनाची भीती

भाजप आणि युवा स्वाभिमानमधील या अंतर्गत वादामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य धोका ओळखून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः अमरावतीत तळ ठोकून आहेत. यापूर्वी त्यांनी रवी राणा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागावाटपावरून आणि उमेदवार देण्यावरून झालेला वाद न मिटल्याने अखेर भाजपने अपक्ष उमेदवाराला साथ देण्याचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे.

साईनगरमधील प्रतिष्ठेची लढाई

आज अमरावतीत प्रचाराचा ‘सुपर संडे’ असून सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत साईनगर प्रभागात पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपचे वजनदार नेते तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडे यांच्यात थेट सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवी राणा यांनी दिलेले आव्हान तुषार भारतीय कसे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रवी राणांची पदयात्रा आणि विजयाचा विश्वास

सचिन भेंडे यांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांनी आज साईनगर प्रभागात मोठी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. “साईनगर प्रभागाची निवडणूक आता जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे सचिन भेंडे यांचा विजय निश्चित आहे,” असे विधान त्यांनी यावेळी केले. प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात रवी राणा यांनी आपली सर्व ताकद सचिन भेंडे यांच्या पाठीशी लावली असून, भाजपनेही तुषार भारतीय यांच्यासाठी कंबर कसली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *