![]()
“मर्यादा पुरुषोत्तम रामाने आपल्याला मर्यादा शिकवली. अटलजी, अडवाणीजी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी ज्या राम मंदिरासाठी आयुष्यभर लढा दिला, त्याच राम मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल, तर यापेक्षा गलिच्छ काही नाही,” अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राम मंदिरातील कथित भ्रष्टाचार, लाडकी बहीण योजना, वाढता गुन्हेगारीचा आलेख, आणि फोडाफोडीच्या राजकारणावरून राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरले. राम मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचारावर संताप अयोध्येतील राम मंदिर, उज्जैनचे महाकाल मंदिर आणि आता सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहारावर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. “राम मंदिर हे आमच्या श्रद्धेचे स्थान आहे. जर तिथे भ्रष्टाचार होत असेल, तर भाजपला प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावे लागेल. आता सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचार सरकारला कालच का सुचला? जर तुम्हाला हे आधीपासून माहीत होते आणि तुम्ही गप्प होता, तर भ्रष्टाचार करणाऱ्याइतकेच तुम्हीही गुन्हेगार आहात,” असा थेट आरोप त्यांनी केला. भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही “काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही त्यातलेच अर्धे नेते पक्षात घेतले. मग ते भ्रष्टाचारी होते की नव्हते? जर नव्हते, तर तुम्ही खोटे आरोप केल्याबद्दल त्यांची माफी मागा. भाजपला आता भ्रष्टाचाराचा ‘भ’ ही काढायचा अधिकार राहिलेला नाही.” ‘लाडकी बहीण’ योजना: महिलांचा केवायसी का नाही झाला? राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या योजनेतील त्रुटींमुळे महिलांची फसवणूक होत आहे. “आधार कार्ड आणि जनधन योजनेचे यश मोदी सरकारने नेहमीच सांगितले. मग आज लाडकी बहीण योजनेत महिलांचे केवायसी (KYC) का होऊ शकले नाही? 80 लाख महिलांचे केवायसी न होणे हे सरकारचे मोठे अपयश आणि फसवणूक आहे. योजनेच्या नावाखाली अनेक पुरुष आणि सरकारी कर्मचारी यात कसे घुसले? याची ‘एसआयटी’ चौकशी झाली पाहिजे.” “इलेक्शन आले की पैसे खात्यात टाकायचे आणि इलेक्शन संपले की काढून घ्यायचे, हे तंत्रज्ञान फक्त निवडणुकीच्या वेळीच कसे चालते? आमच्या मुलांच्या परीक्षांचे पेपर फुटतात, तेव्हा तंत्रज्ञान का चालत नाही?” असा सवाल त्यांनी केला. पुणे क्राईम आणि ड्रग्जमध्ये नंबर 1 राज्यातील आणि विशेषतः पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “मी गृहमंत्रालयाच्या कमिटीवर आहे आणि भारत सरकारचाच डेटा सांगतो की महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आज गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्यात नंबर एकवर आले आहे. ड्रग्ज गावागावांत पोहोचले आहेत आणि पोलिसांची भीती उरलेली नाही.” “काल एका गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाने डॉक्टरांवर हात उगारला. अटक झाल्यावर त्याला लगेच रुग्णालयात जाण्याची सोय मिळते. ही गुंडगिरी राज्यात खपवून घेतली जाणार नाही.” आमदारांना ‘कमोडिटी’सारखे वागवले जाते: नवा कायदा आणणार सोशल मीडिया आणि बातम्यांमधून आमदार-खासदारांची जी चेष्टा केली जात आहे, त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली. “लोकप्रतिनिधींना आज ‘कमोडिटी’सारखे पाहिले जात आहे, हे अस्वस्थ करणारे आहे. यासाठी मी संसदेच्या आगामी सत्रात एक खाजगी विधेयक आणणार आहे. या बिलानुसार, ‘जर तुम्ही एखाद्या पक्षाकडून निवडून आलात, तर तुम्हाला पाच वर्षे पक्ष बदलता येणार नाही. जर पक्ष बदलायचा असेल, तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या.’ संविधानाच्या चौकटीत बदल असायला हवा, अशी माझी मागणी आहे.” खासदार अस्वस्थ असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘शरद पवार गटाचे खासदार अस्वस्थ आहेत’ असे विधान केले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा पृथ्वीराज बाबांशी फक्त माझ्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी संपर्क झाला होता. त्यांना आमचा कोणता खासदार भेटला हे मला माहीत नाही. आमचा कोणताही खासदार बाहेर जाऊन उलटसुलट बोललेला नाही. आमचा पक्ष एकसंध आहे.” अमोल कोल्हेंच्या वक्तव्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “अमोल दादा त्यांच्या शैलीत बोलले होते, पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांनी ‘सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया’ ठेवू नये.” यावेळी सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या विधानसभेतील अभ्यासपूर्ण कामगिरीचेही कौतुक केले आणि संसदेत राष्ट्रवादीचे खासदार सर्वाधिक वेळ थांबून जनतेचे प्रश्न मांडतात, हेही सांगितले. दरम्यान, पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या साखरपुड्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “पवार कुटुंबात लग्नसराई सुरूच आहे. रेवतीचे लग्न झाले, आता पार्थचा सोहळा होणार आहे. अजूनही दोन-तीन आनंदाच्या बातम्या लवकरच मिळतील,” असेही त्या हसत म्हणाल्या. संबंधित बातमी वाचा.. पवार कुटुंबात पुन्हा शुभकार्याची तयारी : 29 जुलैला पार्थ पवार-कायनात धर यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबाची होणारी सून?
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कायनात धर यांच्यासोबत साखरपुडा होणार आहे. येत्या 29 जुलै रोजी पुण्यात हा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धर उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते. आता त्यांच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाल्याने या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही!:खासदार अस्वस्थ असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण, फोडाफोडीच्या राजकारणावर नवे विधेयक मांडणार
