[ads1]
![]()
आईच्या कुशीत विसावण्याचे आणि आईचे दूध पिण्याचे वय असलेल्या अवघ्या महिनाभराच्या बाळाची तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा जन्मदात्या आई-वडिलांनीच पैशांच्या मोबदल्यात त्याचा व्यवहार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बाळाची बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या मायलेकींसह जन्मदात्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी तपास करून सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. सीमा अनिल रेशवाल आणि तिची आई कौशल्या बारकू पवार या दोघींना न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळाच्या विक्रीचा हा प्रकार नेमका कसा घडला, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. बाळाच्या आई-वडिलांची परिस्थिती काय होती? पोलिसांच्या माहितीनुसार, बाळाची 36 वर्षीय आई काही वर्षांपासून मुंबईत राहत होती. तिचा पहिल्या पतीसोबत संसार तुटल्यानंतर तिने आपल्या पहिल्या मुलीला सोडले होते. त्यानंतर मागील 3 वर्षांपासून ती 34 वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या महिलेचा प्रियकरही यापूर्वी विवाहित असून, त्याने आपली पत्नी आणि मुलाला सोडून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली होती. तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे घरची परिस्थिती आणि बाळाच्या भवितव्याबाबत आईसमोर अनेक अडचणी होत्या. घाटी रुग्णालयात झाली कौशल्याशी ओळख 5 जुलै रोजी या महिलेने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयातच तिची संजयनगर परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय कौशल्या बारकू पवार यांच्याशी ओळख झाली. कौशल्या या स्वयंपाकाचे काम करतात. रुग्णालयातील ओळखीचा फायदा घेत त्यांनी बाळाच्या आईशी जवळीक वाढवली. महिलेची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेत कौशल्याने तिच्याशी बाळाच्या संगोपनाबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली. ‘तुझा नवरा बाळाचा सांभाळ कसा करणार?’ पोलिसांच्या तपासानुसार, कौशल्याने बाळाच्या आईच्या मनात तिच्या परिस्थितीबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिचा जोडीदार दारू पित असल्याने तो बाळाचा आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर कौशल्याने तिची मुलगी सीमा रेशवाल हिला बाळ हवे असल्याचे सांगितले. ‘माझी मुलगी बाळाचा सांभाळ करेल. बाळ तिला दिल्यास त्याची योग्य काळजी घेतली जाईल,’ अशा प्रकारे मायलेकींनी बाळाच्या आई-वडिलांचे मन वळवले. सुरुवातीला बाळाची आई मुलाला देण्यास तयार नव्हती. मात्र, वारंवार समजावून सांगितल्यानंतर अखेर आई-वडिलांनी बाळ दुसऱ्याला देण्यास होकार दिला. 8 ऑगस्टला पैशांचा व्यवहार ऑगस्ट महिन्यात बाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 8 ऑगस्ट रोजी सीमा अनिल रेशवाल हिने बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांना 1 लाख 20 हजार रुपये रोख दिले. इतकेच नव्हे, तर या व्यवहाराची नोंद बॉण्ड पेपरवर करण्यात आली. अशा प्रकारे अवघ्या महिन्याच्या बाळाचा पैशांच्या मोबदल्यात व्यवहार करण्यात आला. मात्र, बाळ आईपासून दूर गेल्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती बदलली. बाळापासून दूर गेल्यानंतर आईचे मन बदलले मुलाला दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यानंतर आईला आपल्या बाळाची आठवण येऊ लागली. अखेर तिने सीमा रेशवालकडे बाळ परत देण्याची मागणी केली. मात्र, सीमा बाळ परत देण्यास टाळाटाळ करू लागली. बाळ आपल्याकडे नसल्याचे सांगून तिने आईला वेगवेगळी कारणे दिली. ‘बाळ माझ्या बहिणीकडे आहे, उद्या आणून देते,’ असे सांगून ती वेळ मारून नेत होती. आईने अनेकदा बाळ परत देण्याची विनंती केली. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही बाळ तिच्या ताब्यात देण्यात आले नाही. अखेर हतबल झालेल्या आईने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड बाळाच्या आईने पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान बाळाची बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तींची चौकशी केली तसेच व्यवहारासंदर्भातील माहिती गोळा केली. पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार अशोक कचरे आणि अंमलदार राजाभाऊ कोल्हे यांनी या प्रकरणाचा तपास केला. सीमा रेशवालची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर तपासादरम्यान सीमा रेशवाल हिच्याबाबत आणखी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली. ती पतीपासून विभक्त राहत असून, तिला 2 मुले असल्याचे समोर आले आहे. तिच्याविरुद्ध 2020 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिचे वडील मयत असून, आई कौशल्या ही आपल्या मुलासोबत राहत असल्याचेही तपासात समोर आले. मायलेकींना अटक; इतर आरोपींचीही चौकशी या प्रकरणात 24 सप्टेंबर रोजी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सीमा अनिल रेशवाल आणि तिची आई कौशल्या बारकू पवार यांना अटक केली. दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोठडीदरम्यान सीमा रेशवाल या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. दरम्यान, या प्रकरणात जन्मदात्या आई-वडिलांसह अन्य व्यक्तींची भूमिका काय होती, बाळाचा व्यवहार नेमका कोणाच्या माध्यमातून झाला, पैशांचा व्यवहार कसा करण्यात आला आणि बाळाला पुढे कुठे नेण्यात आले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर अवघ्या महिन्याच्या बाळाला आई-वडिलांनी पैशांच्या मोबदल्यात दुसऱ्याच्या ताब्यात दिल्याचे समोर आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बाळाला जन्मानंतर आईची काळजी, दूध आणि सुरक्षित वातावरणाची गरज असताना त्याचा पैशांत व्यवहार झाल्याने या प्रकरणातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आता पोलिसांच्या तपासातून या बेकायदेशीर व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, बाळाची विक्री करण्यामागील नेमके कारण काय होते आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा… सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांचा पुढाकार:‘सिल्व्हर ओक’वर पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता वेगळे राजकीय महत्त्व आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिली मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन्ही बाजू आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे महत्त्वाची बैठक घेण्यात आली. सविस्तर वाचा…
[ads2]
अवघ्या महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजारांना विक्री:जन्मदात्या आई-वडिलांकडूनच चिमुरड्याचा सौदा
















Leave a Reply