![]()
मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची घेतलेली भेट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. परळ-लालबाग परिसरातील राजकीय समीकरणांवर या भेटीचा नेम
.
या भेटीनंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, ही केवळ सदिच्छा भेट होती. दगडू सकपाळ यांची तब्येत खराब होती, त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे स्पष्ट केले. मात्र, शिंदे आणि सकपाळ यांची भेट सार्वजनिक होताच राजकीय चर्चांना वेग आला. विशेषतः परळ-लालबागसारख्या संवेदनशील आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात या भेटीमुळे मोठा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर दगडू सकपाळ यांनी आपली मनोवेदना मोकळेपणाने व्यक्त केली. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, या शब्दांत त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. पक्षासाठी आयुष्यभर काम करूनही आज आपल्याला बाजूला सारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेषतः आपल्या मुलीला नगरसेवकपदाची उमेदवारी न दिल्यामुळे ते अधिक भावनिक झाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, आणि त्यांचा आवाजही अनेकदा भरून येत होता.
दगडू सकपाळ म्हणाले की, मी नाराज आहे, पण या नाराजीचा आणि एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण कोणाच्याही भेटीला आलेल्या व्यक्तीला घराबाहेर काढू शकत नाही. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री माझ्या घरी आला, त्यामुळे त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं, असे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्याला ज्यांनी घडवलं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोठं केलं, त्यांच्यापासून आपण आज दूर कसे झालो, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत मांडले.
आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना दगडू सकपाळ म्हणाले की, पक्षासाठी मी खूप खस्ता खाल्ल्या. मला आमदार केलं, पण आम्हीही पक्षासाठी घासलो. आज मात्र आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, त्यांना वाटतं माझी गरज संपली, हा म्हातारा झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हे शब्द बोलताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि उपस्थितांनाही त्या क्षणाने भावूक केले. त्यांची ही प्रतिक्रिया केवळ वैयक्तिक वेदना नव्हे, तर पक्षातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे, याचं प्रतीक मानली जात आहे.
दरम्यान, पक्षप्रवेशाबाबत विचारले असता दगडू सकपाळ यांनी अतिशय संयमित भूमिका घेतली. एकनाथ शिंदेंनी मला कोणताही प्रस्ताव दिला नाही आणि मीही तो विषय काढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, माझ्या मनात असतं तर मी माझ्या मुलीला अपक्ष म्हणून उभं केलं असतं आणि निवडूनही आणलं असतं. पक्ष बदलण्याबाबत सध्या काहीही बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी, आज नाही, उद्या मनात आलं तर करू शकतो. जोपर्यंत मनात नाही, तोपर्यंत डोक्यात कशाला आणायचं? अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी नाराजी आणि वेदना असूनही दगडू सकपाळ यांनी मातोश्रीवर टीका करण्यास स्पष्ट नकार दिला. मातोश्री आमचं मंदिर आहे. कुठे गेलो तरी मातोश्रीवर टीका करणार नाही, असे ठाम शब्द त्यांनी वापरले. आपल्या मुलीसाठी उमेदवारी न मिळाल्याने जे दुःख आहे, ते कोणत्याही बापाला झालं असतं, अशी भावनिक टिप्पणी करत ते म्हणाले, माझीच नाही, कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता. या संपूर्ण घडामोडीमुळे शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात दडलेली अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून, आगामी काळात परळ-लालबागच्या राजकारणात नेमका कोणता वळण येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
