[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – रेशन दुकानातून नागरिकांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अवैधरीत्या काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मालवाहू ॲपेऑटो, गहू व तांदूळ असा एकूण १ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना वाजेगाव येथील लाकडी आरा मिशनसमोरील रस्त्यावर एक पिवळ्या रंगाचा मालवाहू ॲपेऑटो (क्रमांक MH-26-BD-0295) संशयास्पदरीत्या थांबलेला आढळून आला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ भरलेला आढळला. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव आवेज कासीमसाब मुंडकर (वय १९ वर्षे, रा. कहाळा बु., ता. नायगाव, जि. नांदेड) असे सांगितले. धान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही पावती किंवा बिल आढळून आले नाही. तसेच त्याने पोलिसांना समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मालवाहू ॲपेऑटो, १६० किलो गहू किंमत ६ हजार ४०० रुपये आणि १६० किलो तांदूळ किंमत ८ हजार रुपये, असा एकूण १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०४/२०२६, कलम ३ व ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Post Views: 215
[ads2]
















Leave a Reply