पुण्यात 4,427 कोटींचा कथित आयकर घोटाळा:शेल कंपन्यांद्वारे परदेशात पैसा पाठवून कर चुकवल्याचा आरोप; दोन सीएंवर गुन्हा

[ads1]


पुण्यात 4,427 कोटी 92 लाख रुपयांच्या कथित आयकर घोटाळ्याप्रकरणी दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात पैसा पाठवून केंद्र सरकारचा आयकर चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासाठी बनावट कागदपत्रे, ऑडिट अहवाल आणि फॉर्म 15सीबी, 15सीए प्रमाणपत्रांचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (वय 34, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (वय 33, रा. कोंढवा बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी प्राधिकरण येथील तन्मयी सुहास देसाई (वय 31) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बगरेचा आणि तोडी यांनी त्यांच्या ‘एम.एस. ओडी अँड असोसिएट्स’ या फर्मच्या माध्यमातून इतर साथीदारांच्या मदतीने हा घोटाळा केला. शेल कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर न करता किंवा त्यांची योग्य तपासणी न करता, परदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म 15सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर ही बनावट प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागासमोर सादर करण्यात आली. तसेच, फॉर्म 15सीए तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. सन 2022 ते 2026 या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित तीन कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 4,427 कोटी 92 लाख 44 हजार 408 रुपये परदेशात पाठवण्यात आले. या रकमेवरील कर चुकवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. परदेशात पाठवण्यात आलेल्या रकमेचा मूळ स्रोत, संबंधित बँक खाती, पैसा कोणत्या देशात पाठवण्यात आला, तसेच तीन कंपन्यांच्या संचालकांची भूमिका याचा तपास पोलीस करत आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *